गार्डनिंग:जलबाग Print

सीमा रमेश मामीडवार, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
९८९०२८५२८६

निसर्गानं प्रत्येकाला सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगण्याची व्यवस्था केली आहे. अगदी साधं व सरळ जीवन जगलं तरी त्यात भरपूर सुख आहे. हे सुख, हा आनंद आपला छोटाशा फ्लॅटमध्ये जलबाग म्हणजे पाण्यातली बाग करून आपण मिळवू शकतो. टॅरेसवर, बाल्कनीत कमी जागेत ही जलबाग कशी करायची, पाण्यात विविध रंगाची कमळ, वॉटर लीली कशी फुलवायची, त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे.
सर्व झाडांसाठी प्रकाश आवश्यक असतो. आवश्यक तेवढा प्रकाश नसेल तर हवी तशी झाडांची वाढ होणार नाही. फुलेही मोठय़ा प्रमाणावर फुलणार नाहीत. जलबाग टॅरेसवर करण्यासाठी गॅल्व्हनाइजड टाक्या म्हणजे कुलर्स ठेवतात. त्या टाक्या लहान आकाराच्या करून वापरता येतील. जलबाग करण्यासाठी ज्या टाकीतील पाणी नेहमी बदलावं लागेल, असं नाही तर कमी झाल्यासारखं वाटलं की पुन्हा टाकीत थोडेपाणी घालत जावं. जलबाग करण्यासाठी जाड प्लास्टीकच्या विविध रंगांच्या कुंडय़ा बाजारात उपलब्ध आहेत. काचेच्या हंडीत ही जलबाग चांगली दिसते. बारीक बांबू, लेडेकरी, पिग्मिया या प्रकाराची झाडं पाण्यात लावता येतात. वॉटर लीलीनं जलबाग मनमोहक दिसेल. रंगीबेरंगी मासे या जलबागेची शोभा वाढवतील. टाकीतील माशांना प्राणवायू मिळावा म्हणून काही प्राणवायू पाण्यात सोडणारी झाडं टाक्यात लावावीत. मासे पाण्यात कार्बनडाय ऑक्साईड वायू सोडतात. ही झाडे हा वायू शोषून घेतात. त्यामुळे पाणीही चांगलं राहतं आणि माशांना आवश्यक असणारा प्राणवायू ही झाडे त्यांना देतात.
सॅगीटेरिया कॅरोलिनाना, एलोंडा ही झाडं पाण्यात प्राणवायू सोडणारी झाडं म्हणून चांगल्या नर्सरीत मिळतात. वॉटर लीलीचे कंद लावावेत. दोन महिन्यांनी वॉटरलिली टाक्यात भरपूर फुलून आलेली दिसेल. कमळाचं फूल तर सर्वाच्याच परिचयाचं आहे. कमळांची फुलं विविध आकाराची आणि सुवासिकही असतात. काही कमळं एकेरी, तर काही कमळाची फुलं दुहेरी असतात. गुलाबी, लाल, जांभळा, पांढरा, पिवळा अशा विविध रंगांची ही फुलं दिसायला छान दिसतात. कमळाच्या फुलांची लागवड त्यांच्या कंदापासून करावी लागते. माती व चांगलं शेणखत यांचं मिश्रण टोपलीत भरावं. मग त्यात अंकुरलेले कमळाचे कंद लावावे आणि ही टोपली पाण्याचे जे तळ असेल त्यात ठेवावे. ठेवतांना अंकुरलेला भाग पाण्याच्या थोडा वर ठेवावा. दहा दिवसांनी झाडास नवीन पालवी फुटलेली दिसली की, ही टोपली हळूहळू खाली पाण्यात बुडवावी. ज्यांना कमळ खूप आवडत असतील त्यांनी सिमेंटची टाकी बनवून घ्यावी. टाक्याच्या तळाशी माती व शेणखताचे मिश्रण घालून जवळपास सहा इंचाचा थर द्यावा. त्यात अंकुरलेला कंद लावावा. काळजी घेतली तर तीन महिन्यांनी विविध रंगांच्या कमळांच्या फुलांनी आकर्षक जलबाग तयार होऊ शकते. कमळाच्या काही जातींची लागवड बियांपासूनही करता येते. या बिया सर्वप्रथम चांगल्या उन्हात वाळवून घ्याव्या लागतात. नंतर टोपलीत लावव्या व टोपली पाण्यात ठेवावी. त्यापेक्षा नर्सरीतून आवडत असलेल्या रंगानं अंकुरीत कंद आणून कमळाची जलबाग तयार करावी. मनुष्याला सतत बदल हवा असतो. बदल म्हणून टॅरेसवर जलबाग करावी. विविध रंगांची दगडं या बागेची शोभा वाढतील. जलबागेमुळे आनंददायक वातावरण व चैतन्य निर्माण होऊ शकतं.