वनातंलं मनातलं : ‘ऑस्प्रे’चा नाद खुळा! Print

डॉ. बहार बाविस्कर, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
९९७५६८०३७५

अमेरिकेला वास्तव्याला आल्यापासून नेहमीच भारतातल्या वन्यजीवांची अन् जंगलांची प्रकर्षांनं आठवण यायची. ओक्लाहोमा राज्यातल्या स्टीलवॉटर इथं माझं वास्तव्य होतं. संशोधनासाठी मात्र अध्र्या एक तासाच्या अंतरावरील रेडलँड इथं जावं लागायचं. या जंगलाच्या एका भागाला घनदाट जंगल, तर दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण, शांत अन् दूरवर पसरलेला तलाव होता. तलावाच्या काठानं चालत असताना सकाळी ‘रकून’, ‘ओपोसम’ या जंगली प्राण्याच्या पायांचे ठसे नेहमीच दिसत असत. हे ठसे बघितले की, मला भारतातल्या जंगलात फिरताना बघितलेल्या वाघ, बिबट, कोल्हे यासारख्या वेगवेगळ्या प्राण्यांचे ठसे आठवायचे. संशोधन संपलं की, मी तलावाच्या काठी फिरत वन्यप्राण्यांच्या जागा धुंडाळत असे.
एकदा भर थंडीच्या दिवसांमध्ये आम्हाला जंगलात टिक ड्रगिंगसाठी जायचं होतं. संशोधनाच्या या पद्धतीत जंगलात बरंच अंतर पायी चालून त्या जंगलप्रकारात आढळून येणाऱ्या जंगली प्राण्यांच्या शरीरावरच्या गोचिडींचा अभ्यास करायचा होता. त्यानिमित्तानं माझं जंगलदेखील फिरणं होत असे. जंगलात फिरत असताना मी मात्र बाल्ड ईगल किंवा ऑस्प्रेसारख्या शिकारी पक्ष्यांच्या घरटय़ास शोधत असे. कडाक्याच्या थंडीनं हातपाय गारठले होते अन् नाक थंडगार झालं होतं. संशोधनाचं काम संपल्यावर का कोणास ठाऊक, पण मला तलावाच्या काठी फिरायची हुक्की आली. फिरत असतानाच कधी पाणपक्ष्यांचा मोठा थवा दिसायचा तर कधी कुठला प्राणी अचानक नजरेआड झालेला दिसायचा. काही वेळ फिरण्यात गेला आणि अचानक एक मोठा शिकारी पक्षी डोक्यावरनं उडत गेला. पहिला अंदाज होता की, तो ऑस्प्रे असावा, पण या भागात तो पक्षी आढळून येतो की नाही, याबद्दल कल्पना नसल्यामुळे मी साशंक होतो. परतीच्या प्रवासात डोक्यात सारखे ऑस्प्रेचेच विचार येत होते. ठरलं, अमेरिकेतला ऑस्प्रे बघायचाच.
अमेरिकेतल्या या गवताळ भागात हिवाळ्याच्या सुरुवातीला अनेक शिकारी पक्षी स्थलांतर करून येत असे. त्यामुळे मी आणखीनच शोधक असे. रेड टेल्ड हॉक अर्थात, लाल शेपटीचा ससाणा तर ओक्लाहोमा राज्याची शान. वर्षभर आढळून येणारा हा पक्षीदेखील काही अंशी स्थलांतर करून हिवाळ्याच्या सुरुवातीला मोठय़ा संख्येनं हजर रहात असे. ऑस्प्रेदेखील दिसायला सुरुवात झालीय, असं जेव्हा कळलं तेव्हा मात्र मी ऑस्प्रेच्या दर्शनासाठी अधिर झालो.
संशोधन चालू असताना मात्र बाल्ड ईगल आणि ऑस्प्रे या शिकारी पक्ष्यांना बघायची ओढ मनाला लागली होतीच आता ती इच्छा पूर्ण करायचीच होती. शिकारी पक्ष्यांवर जीवापाड प्रेम करणारे माझे परममित्र डॉ. लिश चाळीस वर्षांपासून बाल्ड ईगल या शिकारी पक्ष्यावर संशोधन करत असल्यामुळे त्यांची घरटी कुठं आहेत, त्याच्या राहण्याच्या जागा कुठे आहेत, याची त्यांना पक्की माहिती होती. ऑस्प्रे या पक्ष्याच्या जागेबद्दलदेखील त्यांना बरीच माहिती होती. त्यांच्यासोबत एकदा हे दोन्ही पक्षी बघायची मोहीम आखली. ‘सिया’ या गावाला जाताना शेतातनं जाणारी वाट निवडून आम्ही मार्गक्रमण करत होतो. तलावाच्या काठाकाठानं बरंच अंतर फिरत राहिलो. गाडीतनं उतरल्यावरदेखील भर उन्हात बरंच अंतर चालून गेल्यावरदेखील ऑस्प्रे न दिसल्यामुळे मन काहीसं नाराज झालं होतं, परंतु काहीही झालं तरी मोहीम फत्ते करायचीच, असा निर्णय घेतला. चाळीस मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका धरणाच्या क्षेत्रात प्रयत्न करून बघायचं ठरवलं. तिथंदेखील तास दीडतास अंतर चालून गेल्यावरदेखील ऑस्प्रे दिसला नव्हता. दिवसभर उन्हात फिरून खूप थकवा आला होता, पण मागे फिरायला मन तयार नव्हतं.
शेवटी ज्या हॉटेलात आम्ही मुक्कामाला होतो त्या जागी परत जाण्याचं ठरलं. डॉ. लिश यांनी मात्र जाताना जंगलाच्या दुसऱ्या बाजूनं गाडी टाकली तसा मला त्यांच्या डोक्यात दुसरी कुठली तरी मोहीम सुरू असल्याचा अंदाज आला. बराच वेळ गाडी चालत होती. थकल्यामुळे आम्ही दोघंही शांत बसून होतो. एका तलावाच्या काठी आल्यावर मात्र ते गाडी थांबवून एकदम लगबगीनं खाली उतरले आणि मला म्हटलं, ‘बाल्ड ईगल’. गाडीतनं उतरेपर्यंत त्या गरूडाला आमची चाहूल लागली होती तरीही ऐटीत तो तिथंच बसून होता. बसलेल्या बाल्ड ईगलचे शेकडो छायाचित्र काढून झाल्यावर आणखी जवळ गेलो तरीही तो गरूड उडायच्या मनस्थितीत नव्हता. थोडय़ा वेळानं मात्र त्यानं त्याचे बाहू पसरले आणि दमदार भरारी घेतली.
बाल्ड ईगलला बघण्याची इच्छा पूर्ण झाली होती, पण ऑस्प्रे काही दिसला नव्हता. अंधार पडायला आला होता. तलावाजवळचा परिसर शांत आणि गूढ भासायला लागला होता भारतातल्या तलावाकाठसारखा. संध्याकाळचं इथलं वातावरणदेखील तसंच रम्य आणि मनात कुठलीशी हुरहूर निर्माण करणारं. मुक्कामी असलेल्या हॉटेलवर आल्यावर लगेच झोप लागेल, असा अंदाज होता, पण रात्रीच्या गार वातावरणात खूपच मोकळं वाटत होतं. अंधारातच शतपावलीसाठी निघालो. उद्या काहीही झालं तरी ऑस्प्रे बघायचाच, असं पक्क केलं आणि मग मात्र अंथरूणावर पाठ टेकली.
पहाटे लवकर उठून आम्ही आमच्या मोहिमेवर निघालो. पाच वाजेपासूनं जंगल तुडवायला सुरुवात झाली. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत फिरून झाल्यावर मात्र संयमाची परीक्षा सुरू झाली. पोटात कावळे ओरडायला लागले, कावळे कसले गिधाडंच की ते. असह्य़ झाल्यावर मात्र न्याहारीचं सामान बाहेर काढलं आणि पोटाची गाठोडी भरली. पुन्हा ताज्या दमानं प्रवासाला सुरुवात केली आणि अगदी काही अंतर गेल्यावर जंगलातच एका वाळलेल्या झाडावर आम्हाला ऑस्प्रे दिसला. त्याच्या या सुखद आणि अनपेक्षित भेटीनं मी स्तब्ध झालो. त्यानं एका पायात मासा पकडलेला होता आणि चोचीने तो त्याची आतडी बाहेर काढून फस्त करत होता. त्याचे बरेचसे छायाचित्र काढून झाले तसा तो उडाला. पेरेग्राईन फाल्कन सगळ्यात विस्तृत प्रमाणात पसरलेला हा पक्षी त्याच्या मासे पकडण्याच्या खास शैलीमुळे वेगळ्या गटात मोडला जातो.
ऑस्प्रेला बघितल्यावर मोहीम खरंतर थांबवायची होती, पण जंगल खुणावत होतं. आणखी काय काय बघायला मिळेल याची उत्सुकता होती, पण ऑस्प्रे काही मनातनं जात नव्हताच. माझा हा खुळा नाद डॉ. लिश यांनादेखील खूप आवडला होता. त्यांच्या नजरेतनं ते मला ‘तू वेडा आहेस’ सांगत होते खरं, पण माझं लक्ष्य कुठे होतं त्यांच्याकडे. मी तर अजूनही ऑस्प्रेच्या आठवणीत रेंगाळत होतो.