जाणिजे जे यज्ञकर्म : आगळावेगळा चारू ताल! Print

संध्या दंडे, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

९२२५६६६८९१
अंगी उपजत कला असली की, त्या कलेशिवाय त्या व्यक्तीचे मन दुसरीकडे लागत नाही. ओढ असते कलेचीच! मग कलेची कोणत्या ना कोणत्या प्रकारात सेवा घडतेच. असंच घडलं चारूदत्त जिचकारांच्या बाबतीत. घरात संगीताचं वातावरण होतचं. आई व बहीण दोघीही संगीत विशारद. साहजिकच चारूदादाही गाणं शिकू लागले. बुलढाण्याला राहत असताना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं वार्षिक संमेलन होतं. त्यात बहीण गाणार होती. त्यावेळी गावात असणारे एकमेव तबलजी तिच्या साथीला आलेच नाहीत. चारूदादांच्या वडिलांनी सांगितलं, उद्यापासून गाणं बंद. तिथून तालाची संगत सुरू झाली. बुलढाण्याच्या पवार गुरुजींकडे तबल्याचं रीतसर शिक्षण सुरू झालं. उपांत्य विशारदपर्यंतच्या परीक्षा, महाविद्यालयीन शिक्षण सांभाळत दिल्या. पोटापाण्याला लागल्यावर विशारद करू शकलो नाही, पण ताल सुटला नाही, असे चारूदादा सांगतात.
काही दिवस ट्रान्सपोर्टचा व्यवसाय केला, कॉफी हॉऊस सुरू केले. सिटी कुरिअरची फ्रँचाईसी घेतली, पण मन रमत नव्हतं. हे व्यवसाय करीत असताना लक्षात आलं की, संगीतक्षेत्राशिवाय पर्याय नाही. कशातच ‘जॉब सॅटिस्फॅक्शन’ मिळत नव्हतं, मिळणारही नव्हतं. कादर ऑर्केस्ट्रा, स्वर सुमनांजली, म्युझिकल विनर्स या गाजलेल्या ऑर्केस्ट्रांमध्ये चारूदादा ‘ताल’ सांभाळत. तबला, ढोलक, ऑक्टोपॅड व इतर तालवाद्य व वेगवेगळे ध्वनी परिणाम साधणारी ‘मायनर’ प्रकारातली सर्व वाद्य ते उत्तम वाजवतात. नंतर अश्रफी स्टुडिओ, म्युझिरेका या रेकॉर्डिगच्या वेळी तालवाद्यांची संगतही केली. आता तालवाद्यांबरोबरच रेकॉर्डिगच्या तंत्रज्ञानात त्यांना आवड निर्माण झाली. तालवाद्यं वाजवता वाजवता रेकॉर्डिगच्या तंत्राचं निरीक्षणही सुरू झालं. ‘केशवानंद’ स्टुडिओत काम करताना साऊंड इंजिनीअर व रेकॉर्डिस्ट बंडू पदम यांच्याशी मैत्री झाली. त्यांचं काम पहाताना मी शिकत गेलो. त्यांनी अनेक गोष्टी समजावून सांगितल्या, असं चारूदादा आवर्जून सांगतात.
त्यावेळी अजून डिजिटल तंत्र वापरात नव्हतं. लाईव्ह रेकॉर्डिग व्हायचं. आधी स्पूलवर रेकॉर्डिग होत असे. नंतर क्रोम कॅ सेटस् आल्या. चूक झाली तर संपूर्ण रेकॉर्डिग पुन्हा करावं लागे. त्यात सर्वच कलाकारांचा वेळ वाया जायचा. तेही तंत्र चारूदादांना अवगत होतं. आज डिजिटल तंत्रज्ञानामुळे काम सोपं झालं. वेळ वाचतो, खर्चही वाचतो, पण कलाकारांना परफेक्ट असणंही गरजेचं झालं. ९ वर्षांपूर्वी चारूदादांनी स्वत:चा रेकॉर्डिग स्टुडिओ ‘मधुरिका स्टुडिओ’ सुरूकेला. अनेक मोठे कलावंत रेकॉर्डिगसाठी मधुरिकात येऊन गेले. साईबाबांवरील महानाटय़ाचं सर्व रेकॉर्डिग चारूदादांनी केलं. त्यावेळी साईबाबांच्या डबिंगसाठी सुधीर दळवी आले होते. गजानन महाराज, स्वामी समर्थ, शिवाजी महाराजांवरील महानाटय़ांचं रेकॉर्डिग चारूदादांनी मधुरिकात केलं. कवी ज्ञानेश वाकुडकरांनी लिहिलेली व मोरेश्वर निस्तानेंनी संगीतबद्ध केलेली व सुरेश वाडकरांनी गायलेली एक गझल चारूदादांनी रेकॉर्ड केली. तिचं रेकॉर्डिग व एडिटिंग यामुळे प्रभावित होऊन सुरेश वाडकर त्यांच्या कामाची नेहमीच तारीफ करतात, हे चारूदादांनी अभिमानानं सांगितलं. गायक रवींद्र साठे स्वत: उत्तम रेकॉर्डिस्ट आहेत. चारूदादांचं काम पाहून व ऐकून त्यांनाही वाव दिला. चारूदादांनी उदित नारायण, अनुप जलोटा, साधना सरगम व इतरही गायकांचे अल्बम रेकॉर्ड केले आहेत. या कामात त्यांचे मित्र व अतिशय गुणी कलावंत मोरेश्वर निस्ताने व मुलताई (म.प्र.)चे पुष्कर देशमुख या संगीतकारांची मोलाची साथ त्यांना असते.
स्वप्नील बांदोडकरांचं रेकॉर्डिगही त्यांनी आपल्या स्टुडिओत केलं आहे. इतक्यातच प्रदर्शित झालेल्या ‘बाबुरावला पकडा’ या चित्रपटाचं डबिंग चारूदादांनी केलं आहे. आतापर्यंत त्यांनी ७०० ते ८०० अल्बमस्चं रेकॉर्डिग केलं आहे. माझ्याबरोबर गायक, संगीतकार, वादक यांची उत्कृष्ट टीम आहे. त्यामुळे कोणतंही मोठं काम करण्याची आमची तयारी आहे, असं ते म्हणतात. ‘रंगस्वानंद’ या संस्थेत किशोर आयलवारांबरोबर नाटकातून भूमिका केल्या असल्यानं स्पष्ट शब्दोचार, आवाजातील चढउतार यांची त्यांना चांगली जाण आहे. तसंच लहानपणी वाचनाची आवड असल्यानं नाथमाधव, अत्रे, पु.ल. यांचं साहित्य व ग्रंथालयातील पुस्तकांचा वाचून पाडलेला फडशा यामुळे झालेले भाषेचे संस्कार, चारूदादांच्या एडिटिंगला वेगळीच उंची देतात. मराठी साहित्याची गोडी वडिलांमुळे लागली, पण आता कामामुळे वाचन होत नाही. चारूदादांच्या कामाच्या वेळा काहीच ठरलेल्या नसतात. कलाकारांच्या सोयीच्या वेळेप्रमाणं रेकॉर्डिग होतं व नंतर इतर कामांचा मेळ घालत एडिटिंग यामुळे कधी सकाळी ७ वाजता आलेले चारूदादा केव्हातरी घरी परततील, याचा नेम नसतो. वाणिज्य शाखेचे स्नातक असलेल्या चारूदादांनी पत्रकारिता व समाजकार्याची स्नातकोत्तर पदवीही घेतली. बरेच व्यवसायही केले, पण ते रमले आहेत ते तालात, संगीतातच!    

९ वर्षांपूर्वी चारूदादांनी स्वत:चा रेकॉर्डिग स्टुडिओ ‘मधुरिका स्टुडिओ’ सुरूकेला. अनेक मोठे कलावंत रेकॉर्डिगसाठी मधुरिकात येऊन गेले. साईबाबांवरील महानाटय़ाचं सर्व रेकॉर्डिग चारूदादांनी केलं. त्यावेळी साईबाबांच्या डबिंगसाठी सुधीर दळवी आले होते. गजानन महाराज, स्वामी समर्थ, शिवाजी महाराजांवरील महानाटय़ांचं रेकॉर्डिग चारूदादांनी मधुरिकात केलं.