दखल : मनातील ॠतूंच्या नोंदी जपणारी कविता Print

प्रमोद लेंडे-खैरगावकर, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
९७६७६३६२९१

वसंत वाहोकर हे नाव काव्यक्षेत्रात स्थिरावलेले नाव आहे. वृत्तपत्रीय स्तंभलेखन, कथालेखन, मुलाखतकार, अशा भूमिका ते निभावत वाङ्मय सेवा सातत्याने करीत आहे. ते केवळ हौसेनं लेखन करणारे अर्धकच्च्या वृत्तीचे ते कवी नाहीत. गंभीर, चिंतनशीलतेबरोबरच समकालीन वास्तवदर्शी भान त्यांच्या कवितांना मूलत: प्राप्त झालं आहे. हे भान अभिव्यक्त करताना त्यांचा प्रतिभाधर्म काव्याभिव्यक्तीशी एकरूप झाला आहे. त्यात उपरोधात्मक काव्यशैलीचा वापर करताना ते दिसून येतात.
त्यांच्या ‘स्वप्नावरून हत्ती झुलत जातात’ या पहिल्याच काव्यसंग्रहातून चिंतनशील व्यक्तिमत्त्वाचा परिचय अभ्यासकांना झाला आहे. तो जोश कायम ठेवूनच ‘मनातील ॠतूंच्या नोंदी’ करायला कवी वाहोकार धाडसानं सामोरं जातात. अनेक नोंदी मांडताना कवी मानवी मनाच्या अतितरल भावस्पर्शी जाणिवेचा वेध घेताना दिसून येतो.
‘दावण’ या कवितेमधून विझत चाललेल्या मानवी मनातील प्रश्नांना ते हात घालतात. दावणीतील बैलाला ते ‘डंगऱ्या’ या उपरोधात्मक शब्दानं संबोधतात. चुलीवर शिजणारं मांस अन्न म्हणून खाल्लं जाणं, मांसाचा बाजार, खुंटीला टांगलेलं बकऱ्याचे शीर, भाजीसारखं हारीनं मांडलेले मांसाचे ढीग ही खाटकीय व्यवस्था कवी चित्रित करतो. आयुष्यभर शेतकऱ्यांसोबत राबणारा बैल उत्तरार्धात त्याला कत्तलखान्यात जावं लागतं हे भीषण वास्तव कवी पाहून हादरून जातो. शिव्या हासडण्यापलीकडे तो कहीच करू शकत नाही. विहिरीचं खोल जाणं हे कृषी संस्कृतीचं दळभद्री चिंतनही कवी ‘विहीर’ कवितेत करतो. ‘सरकार’ कवितेत व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह ठेवून सिमेंट खाणारे रस्ते पाहून हैराण होतो. हे वास्तवाचे प्रदेश अनेकार्थानं वाहोकारांच्या कवितेत आले आहेत.
वसंत वाहोकार यांच्या काव्यलेखनात जीवनमूल्यांचं, निष्ठांचं रोपण झालं आहे. देखाव्याचं जग पाहून मनोरंजनात्मक भूमिका स्वीकारणारा हा कवी नाही. वैविध्यपूर्ण वैशिष्टय़ांनी पखरण त्यांच्या कवितेत झाली आहे. ही प्रवृत्ती त्यांच्या बाण्याला शोभणारी अशीच आहे. आशयाचे विविध पदर त्यांच्या कवितेत दृगोचर झाले आहेत. कथात्मकदृष्टय़ा, उपहासात्मक पद्धतीचा अवलंब करून मुक्तछंद त्यांनी हाताळला आहे. ते हाताळताना त्याला कुठंही बाधा पोहोचू दिलेली नाही. त्यांची काव्यशैली गद्यात्मक दृश्यभान जोपासणारी अशीच आहे. त्यांच्या अनेक कवितांमध्ये वृत्तामध्ये लेखन झालं असून लय, यमक, साधलं गेलं आहे.
‘डवकन’ या कवितेत बेवारस अगतिक स्त्रीत्वाशी माणसांच्या कामुक वृत्तीचं चित्रण झालं असून वासनांची झाडंझुडपं कशी सभोवताल वाढलेली आहे, या वास्तवाचं कवी प्रकटीकरण करताना कधी शिव्यांचा आधार घेतो तर कधी अश्लील वाटणाऱ्या, संस्कृतीभानाच्या चाकोरीत न बसणाऱ्या शब्दांचा मारा करतो. त्यामागं आत्मीय आकसाची भावना आहे.
‘लता टिपटाळेकर’ या कवितेत तमाशातील सौंदर्यतारकेच्या नादी लागलेल्या तारुण्यावस्थेची चेष्टा उडवतानाच त्या नटीच्या जीवनातील प्रखर वास्तवही कवी टिपण्यात यशस्वी होतो. त्यात कारुण्याचा भाव प्रकट होतो. हाच भाव ‘तिसरे’ या तृतीयपंथीय अलक्षित जीवन जगणाऱ्या ‘हिजडा’ म्हणून हिणावल्या गेलेल्या मानवी मनाचाही वेध घेतात. ‘ही बिल्लोरी नाती’मध्ये नात्यातील गहिवर व्यक्त करताना मनातील सुकलेल्या गजऱ्याची व्यथा कवी चितारतो. तो गाव दूर राहिल्याची कबुली देताना पेटत्या दिव्यातील वातींचं कोरडेपण हे कवीच्या मनातील कोरडेपण कायम सलत असल्याची खंत आहे.
वाहोकारांच्या अनेक कवितांमध्ये गेयता आली आहे. ती विशुद्ध भावकाव्याच्या पातळीवर उतरली आहे. त्यात अस्वस्थता, कारुण्य, अगतिकता व समाजमन चेतविणारे समकालीन प्रश्न आहे. या सर्वाचं कारण प्रचंड दु:ख कवीच्या अंतर्विश्वात खल माजवत आहे. प्रश्न सामाजिक आहे. मानवी मनातील द्वंद्वावस्था चितारणारे आहे. ते काव्यधर्माशी सांगड घालीत मनाचे विविध पदरी आयाम प्रसृत करीत असतात. ‘बाप आहेच जगात अजून’ या कवितेत करपून गेलेल्या बालपणाची व्यथा आली आहे. हे वास्तव मांडताना महानगरी हस्तिदंती मनोऱ्यात बंदिस्त झालेल्या कलावंताचं संवेदनाहीन जीवनमान अधिक्यानं चित्रित होतं. या मनातील नोंदी जागतिकीकरणाच्या प्रवाहातही मोठय़ा सामर्थ्यांनं पुढं जात आहे.
वसंत वाहोकार यांच्या ‘मनातील ॠतूंच्या नोंदी’ या कवितासंग्रहात महानगरीय संवेदना, कार्पोरेट युगात जगणारे पॅकेजमय चेहरे, समकालीन वास्तवभान, बुरसटलेली तरुण पिढी, हरवलेली ग्रामीणता, स्वार्थपिपासू वृत्ती, रसातळाला पोहोचलेली माणुसकी, बकाल जीवनमान, नागरी जीवनातील ग्लोबलता व कृषीजीवनातील अगतिकता हा वास्तवप्रदेश आलेला आहे. १२१ कवितांचा समावेश असलेला हा काव्यसंग्रह ज्येष्ठ कवी श्रीधर शनवारे यांच्या प्रस्तावनेनं कृतार्थ पावला आहे. विजय प्रकाशन नागपूरद्वारा प्रकाशित व विवेक रानडेंचं मुखपृष्ठ लाभलेला कवितासंग्रह चिंतनशील मनाला आनंद देणारा आहे. १२५ रुपये किंमत असलेला हा कवितासंग्रह रसिक वाचकांच्या मनातही नोंदी करेल, यात काही दुमत नाही.