गर्डनिंग : कमी वेळेत फुलवू सुंदर बाग Print

सीमा मामीडवार, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
९८९०२८५२८६

पर्यावरण किंवा निसर्ग हे शब्द उच्चारले तरी आपल्याला खूप आनंद होतो. झाड, फूल, पशुपक्षी, झरे, नदी ही सगळी आपल्या डोळय़ासमोर येतात. निसर्गाचं संवर्धन करणं आणि निसर्गातला आनंद टिपणं हा छंद खूप मानसिक समाधान देणार आहे. सर्वानीच निसर्गात रमण्याचा आनंद लुटायला हवा, पण आजकाल सगळय़ांचं जीवन इतकं घाईगर्दीचं झालं आहे की, आपल्याला बागेची आवड जरी असली तरी कमी वेळेत हे शक्य होत नाही, असेच नेहमी ऐकिवात येतं. चाकरमान्या महिलांना देखील मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं, स्वत: फिट राहण्यासाठी व्यायामाला वेळ देणं, सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळायाला वेळ देणं त्यामुळे निसर्गात रमण्यासाठी बागेसाठी पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही. मी तर म्हणते की, आपला उत्साह वाढवायला गार्डनिंगमुळे खूप मदत होते. कमी वेळेत बाग सुंदर कशी करायची ते बघू या.
तुमच्याकडे वेळ कमी आहे ना मग बागेचं जे अत्याधुनिक टेक्निक आहे तेच वापरा. आपल्या आवडीचं झाड बागेत लावा म्हणजे कंटाळा न येता निखळ आनंद आपल्याला मिळेल. बागेतल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला खूप आवडतात आणि मुळीच आवडत नाही, ते आधी ठरवा. आपल्या घरची बाग वैशिष्टय़पूर्ण व सुंदर असावी, हे तुमचं स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तुम्ही किती रुपये खर्च करणार तेही ठरवायचं आहे. योग्य वाटत असेल तर जरूर खर्च करा. किती वेळ रोज बागेसाठी द्यायचा तेही ठरवावं. कमी वेळेत सुंदर गार्डन तयार करायचं म्हटले की, आपल्या हवामानात टिकून राहणारी झाडंच बागेत लावावी. चांगली नर्सरीतून निरोगी व सशक्त झाडं विकत आणावी. बागेत वेली वगैरे अशा लावाव्यात की, ज्यांना चढवायला सपोर्टची गरजच नको.
रेल्वेक्रीपर, आय व्ही प्लाँट अलमंडा या वेली सुंदर दिसतील. फॉर्मल हेच असली की ट्रिनिंग करावं लागतं म्हणून इन्फॉर्मल बॉर्डर लावावी. नेहमी हिरवीगार दिसणारी दुनिया सारखी शर्ज लावावी म्हणजे नेहमी कटिंग करावी लागणार नाही. फास्ट काम करण्यासाठी कचरा वाहून नेण्याची गाडी, शिडी, धुम्मस, झारी, पावडे, टोपले, कैची, खुरपी लॉनमोअरचा बागेत उपयोग करावा. खूप मोठे लॉन असेल तर इलेक्ट्रिक लॉनमोअर घ्यावा. अ‍ॅटोमॅटीक वॉटरिंग सिस्टीम लावून घ्यावी. ज्या झाडांना रोज पाणी देण्याची गरज आहे. त्याच झाडांना रोज पाणी देण्याची गरज आहे. त्याच झाडांना पाणी द्यावं.  
ज्याला वर्षभर भरपूर फूलं राहतील अशीच झाडं बागेत लावावीत. एकझोरा, मसुंडा, अलमंडा, कर्दळी, कन्हेरी, मोगरा, गुलाब आदी हंगामी फुलांची मजा घेण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. खर्चही खूप करावा लागतो. लॉनचा आकार सिंपल असावा व लॉन दिसावे म्हणून कमीतकमी उंचीचा किनारा असावा. कॉर्नर्सला वेगवेगळे आकार देऊन नीट कटिंग करण्याला वेळ लागत असेल तर सिंगल बेड करावा म्हणजे सोपे जाईल. आपल्या उष्ण हवामानातही जगू शकतील अशीच झाडं निवडावीत. महिन्यातून एकदा रोगोर व बावेस्टीन मिक्स करून औषधांची फवारणी करावी म्हणजे रोग व कीडीपासून संरक्षण मिळेल. निसर्गाच सौंदर्य हे नैसर्गिकही असतं आणि प्रयत्नांनी निर्माणही केलं जाऊ शकतं. आपल्या इच्छेनुसार जे डोळय़ाला सुंदर दिसेल, आवडेल तेच ठेवावं. नको असेल ते काढून टाकावं. अशी कमी वेळेत रिलॅक्स होता येईल, अशी बाग छोटीशी का होईना पर जरूर फुलवा.