वित्त-नाविन्य : तुमची ‘पत’ काय? Print

राजीव राज, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘क्रेडिट स्कोअर’ ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो. ७०० ते ९०० मधला ‘स्कोअर’ उत्कृष्ट मानला जातो. कर्जदार कर्जाचे हप्ते वेळेवर भरत असल्यास ‘स्कोअर’ सुधारतो. हप्ता चुकला किंवा कर्ज वेळेवर फेडले गेले नाही तर ‘स्कोअर’ घसरतो.-अलीकडे बँकेने गृहकर्ज नाकारण्याच्या घटना प्रकर्षांने समोर येत आहेत. विशेष म्हणजे, चांगल्या कंपनीत, चांगल्या पगारावर काम करणाऱ्या नोकरदार अर्जदारांना बँका कर्ज देण्यास नकार देत आहेत. या नकारामुळे अर्जदारांना घर घेताना धक्काच बसतो. मग बँकेच्या नकारामागची कारणे शोधली जातात आणि बऱ्याच नकारांमागे वाईट ‘क्रेडिट रिपोर्ट’ हेच कारण असल्याचे समोर येते. गेल्या वर्षी  साधारणत: ७०% गृहकर्जाची प्रकरणे हाताळताना बँकांनी अर्जदाराचा ‘क्रेडिट रिपोर्ट’ पाहिला होता. हे प्रमाण वाढतच जाईल, कमी होणार नाही. गृहकर्जाबरोबरच क्रेडिट कार्ड, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणत्याही कर्जाच्या अर्जावर निर्णय घेताना बँका आवर्जून ‘क्रेडिट रिपोर्ट’ बघू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने स्वत:च्या ‘क्रेडिट रिपोर्ट’ची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
सध्या भारतात ‘क्रेडिट इन्फोम्रेशन ब्युरो ऑफ  इंडिया’ (सिबिल), एक्स्पेरीयन, हायमार्क, इक्विफक्स असे चार ‘क्रेडिट ब्युरो’ आहेत. हे ब्युरो तुमचे ‘क्रेडिट रिपोर्ट’ तयार करतात. ‘क्रेडिट ब्युरो’चे सभासद बँका व वित्तीय संस्था असतात. प्रत्येक सभासद आपल्या कर्जदाराची माहिती या ब्युरोला दर महिन्याला देतो. ब्युरो ही माहिती साठवतात. त्या माहितीचे संकलन करून ‘क्रेडिट रिपोर्ट’ तयार केले जातात.
आता आपण ‘क्रेडिट रिपोर्ट’ म्हणजे काय ते पाहू. ‘क्रेडिट रिपोर्ट’मध्ये कर्जदाराची वैयक्तिक माहिती जसे पत्ता, जन्म तारीख, संपर्क क्रमांक, पॅन आदी असते. एकापेक्षा जास्त पत्ते - घराचा पत्ता, कार्यालयाचा पत्ता - असल्यास तेही नमूद केले जातात. थोडक्यात काय तर तुमची ओळख पटविली जाते. त्यानंतर या रिपोर्टमध्ये आजवर तुम्ही घेतलेली सर्व कर्जे तसेच क्रेडिट कार्ड यांची संपूर्ण माहिती दिलेली असते. कोणते कर्ज कधी घेतले, किती रक्कम कर्ज म्हणून घेतले याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर या प्रत्येक कर्जाची परतफेड कशी चालू आहे, त्याची माहितीदेखील या ‘क्रेडिट रिपोटर्’मध्ये दिली जाते. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही कर्जे कशी घेता, त्याची परतफेड करता का या व अशा कर्जविषयक व्यवहारांमध्ये तुमची वागणूक कशी आहे, याचे एक प्रगती पुस्तकच म्हणजे तुमची ‘क्रेडिट रिपोर्ट’. यामध्ये असलेली माहिती वापरून ब्युरो तुम्हाला एक ‘क्रेडिट स्कोअर’ देतो. हा ‘क्रेडिट स्कोअर’ ३०० ते ९०० च्या दरम्यान असतो. ७०० ते ९०० मधला ‘स्कोअर’ उत्कृष्ट मानला जातो. कर्जदार कर्जाचे हप्ते वेळेवर भरत असल्यास ‘स्कोअर’ सुधारतो. हप्ता चुकला किंवा कर्ज वेळेवर फेडले गेले नाही तर ‘स्कोअर’ घसरतो. ‘क्रेडिट कार्ड’ व वैयक्तिक कर्जाचा अती वापर केल्यास किंवा वारंवार कर्जाची मागणी केल्यासही ‘स्कोअर’ घसरतो. तुम्ही जर दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीन राहिले असाल आणि मूळ कर्जदाराने कर्ज न फेडल्यास तुमचा ‘स्कोअर’ कमी होतो. म्हणजेच कर्ज घेताना किंवा कोणालाही कर्ज घेण्यास मदत करताना दहा वेळा विचार करा. कर्ज फेडणे शक्य नसेल तर या फंदात पडू नकाच. काही वेळा कर्जदार कर्ज घेतात पण ते वेळेवर फेडत नाहीत. बँक सुरवातीला तगादा लावते. पण नंतर एकूण मुद्दल व व्याजाची पूर्ण मागणी सोडून देते व साधारणत: ७०% रकमेवर तडजोड करते. कर्जदाराला वाटते की मी बँकेला कसे ठकवले. पण अशी प्रकरणे ‘क्रेडिट रिपोर्ट’मध्ये ‘सेटल्ड’ अशा शेऱ्यासह दिसून येतात. त्यामुळे ‘क्रेडिट स्कोअर’ घसरतो व बँका भविष्यात त्या कर्जदाराला कर्ज देत नाहीत. आपल्या देशात ‘आयडेंटीटी थेफ्ट’चे प्रमाण जास्त आहेत. एखाद्या व्यक्तीची कागदपत्रे वापरून बँकांकडून परस्पर कर्ज उचलण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे तुमच्या नकळत कुणीतरी तुमच्या नावावर कर्ज घेतो व ते परतफेड करत नाही. त्यामुळे तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’ कमी होतो.
तुम्ही बँकेकडे कर्जासाठी अर्ज करता तेव्हा ती बँक ‘क्रेडिट ब्युरो’ला तुमचा ‘क्रेडिट रिपोर्ट’ मागते. साधारणत: ७०० पेक्षा अधिक स्कोअर असेल तर कर्ज सहज मिळते. ७०० पेक्षा कमी स्कोअरला कर्ज मिळणे थोडे कठीणच आहे. काही बँका व वित्तीय संस्था अशा कमी स्कोअर असलेल्या मंडळींना कर्जे देतात; पण अशा कर्जाचे दर वाढीव असतात. त्यामुळे तुमचा स्कोअर ७०० च्या वर ठेवणे तुमच्या हिताचे आहे. तुम्हाला तुमचा स्कोअर जाणून घ्यायचा असेल तर ‘सिबिल क्रेडिट ब्युरो’च्या संकेतस्थळावर ठराविक शुल्क भरून तशी सोय केलेली आहे. ‘आयडेंटीटी थेफ्ट’मुळे ‘क्रेडिट स्कोअर’चे होणारे नुकसान टाळणे तसेच बँकांच्या नजरचुकीमुळे होणारी ‘क्रेडिट स्कोअर’ची  हानी टाळण्यासाठी वर्षांतून एकदा तरी आपला ‘क्रेडिट स्कोअर’ जाणून घेणे आवश्यक आहे.    
(लेखक आर्थिक साक्षरतेसाठी कार्यरत ‘क्रेडिटविद्या डॉट कॉम’चे संस्थापक-संचालक आहेत)