विमा विश्लेषण : हायब्रिड अविवा लाइफ शिल्ड अ‍ॅडव्हान्टेज Print

दिलीप सामंत, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारतात १९८४ साली भारतात स्थापन झालेला डाबर उद्योग समूह आणि १६९६ साली इंग्लंडमध्ये स्थापन झालेल्या अविवा इन्शुरन्स यांच्या सहयोगाने २००२ साली भारतात सुरू झालेल्या अविवा इंडिया या कंपनीची ‘जरा हटके’ असलेली अशी ही विमा पॉलिसी. गेल्या ३०० वर्षांपेक्षा जास्त काळ विमा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली अविवा ही कंपनी प्रीमियम संचय करण्याबाबत जगात ६ व्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत विमा विक्रेत्यांनी पारंपरिक जीवन विम्याऐवजी विमाइच्छुकांवर दुसऱ्या एका विमा पर्यायाचा भडिमार केला आणि त्यामध्ये लाखो गुंतवणूकदार पोळले गेले. या ‘युलिप’ (ULIP) संकल्पनेची जनक ही अविवा कंपनी.
आज विमाइच्छुक बऱ्याच प्रमाणात शिक्षित झालेले आहेत. प्युअर टर्म पॉलिसी सर्वात जास्त लाभदायक आहे याची त्यांना जाणीव झालेली आहे. तरीही त्यांच्या मनामध्ये खोलवर कोठेतरी (पॉलिसीच्या टर्ममध्ये जिवंत राहिलो तर) प्रीमियमची रक्कम वाया जाणार याची खंत त्यांना जाणवत असते. या मानसिकतेचा पुरेपूर फायदा उठवून विमा कंपन्यांनी एक नवीन प्रकारची पॉलिसी तयार केलेली आहे. अविवा लाइफ शिल्ड अ‍ॅडव्हान्टेज ही याच ‘हायब्रीड’ प्रकारातील पॉलिसी आहे. ही धड प्युअर टर्म प्रकारात बसत नाही आणि धड एन्डाऊमेंट प्रकारातीलही नाही.
ठळक वैशिष्टय़े :
१) १८ ते ५५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी ही पॉलिसी उपलब्ध आहे.
२) ही प्युअर टर्म (बिननफ्याची) पॉलिसी असली तरी विमाधारक पॉलिसीची पूर्ण टर्म जिवंत राहिला तरी त्याला त्याच्या मूळ प्रीमियमची रक्कम परत मिळते.
३) यामध्ये अपघातामुळे आलेले अपंगत्व, दुर्धर आजार, अर्धागवायू वगैरेंसाठी रायडर्सची सोय आहे. त्यासाठी जमा केलेली अतिरिक्त रक्कम मात्र टर्म संपल्यावर परत मिळत नाही.
alt
४) पॉलिसीची टर्म १० ते ३० वर्षांपर्यंतची असते.
५) विमाछत्र - कमीत कमी २ लाख रु.
ठळक वैशिष्टय़े :
विमाधारकाचे वय - ३० वर्षे
टर्म - ३० वर्षे
प्रीमियम भरायची टर्म - ३० वर्षे
विम्याची रक्कम - १ कोटी रु.
वार्षिक प्रीमियमची रक्कम - ३२,४०० रु. (अधिक सव्‍‌र्हिस टॅक्स) विमाधारकाने कोणत्याही प्रकारचे रायडर्स घेतलेले नाहीत.
पॉलिसीचे लाभ :
विमाधारकाचा पॉलिसीच्या ३० वर्षांच्या टर्ममध्ये म्हणजे त्याच्या वयाच्या साठीपर्यंत मृत्यू आला तर विमा कंपनी नामनिर्देशित व्यक्तीला १ कोटी रु. देणार.
विमाधारकाने पहिल्या तीन वर्षांचे प्रीमियम भरल्यानंतर केव्हाही प्रीमियम भरणे बंद केले तर त्याची पॉलिसी त्या वर्षी मॅच्युअर झाली असे समजून पॉलिसीची टर्म संपल्यानंतर त्याने भरलेल्या सर्व प्रीमियमची रक्कम त्याला परत करण्यात येणार. त्याचबरोबर त्याने जमा केलेल्या हप्त्यांच्या प्रमाणामध्ये असलेले विमाछत्र कायम राहणार. उदाहरणार्थ, त्याने सहा वर्षांचे हप्ते भरलेले असतील तर त्याच्या साठाव्या वर्षी १,९४,४०० रु. (३२,४०० x ६) परत मिळणार आणि तोपर्यंत २० लाख रु.चे (१,००,००,००० x ६÷३०) विमाछत्र कायम राहणार.
विश्लेषण :
या पॉलिसीची निवड करण्याचे प्रमुख कारण आहे. पॉलिसीच्या ३० वर्षांच्या कालावधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला नाही तर त्याने भरलेले सर्व हप्ते परत मिळणार. विमाधारक खूश. परंतु गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर परतावा शून्य. हा विचार सहसा कोणीही करीत नाही. या पॉलिसीसाठी ३० वर्षे जमा केलेल्या वार्षिक हप्त्यांची एकूण रक्कम होते ९,७२,०० रु. आणि ती रक्कम विमाधारकाच्या साठाव्या वर्षी त्याला परत मिळते. विमाछत्र तितकेच (१ कोटी रु.) ठेवून या ९,७२,००० रु.वर जास्तीची रक्कम प्राप्त होऊ शकते काय, त्याचा विचार करूया.
याच कंपनीची दुसरी एक बिननफ्याची प्युअर टर्म पॉलिसी आहे. त्यामध्ये ३० वर्षांच्या टर्ममध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला नाही तर जमा केलेल्या हप्त्यांपैकी काहीही परत मिळत नाही. वरील उदाहरणामधील व्यक्तीने ती पॉलिसी घेतली तर वार्षिक प्रीमियम आहे ८२७९ रु. (अधिक सव्‍‌र्हिस टॅक्स). तीस वर्षांच्या प्रीमियमची एकूण रक्कम होते २,४८,३७० रु. अविवा लाइफ शिल्ड अ‍ॅडव्हान्टेजच्या एकूण हप्त्यांच्या तुलनेत बचत ७,२३,६३० रु. (९,७२,०००-२,४८,३७०) ही रक्कम २५ वर्षांमध्ये विभागली तर वार्षिक रक्कम होते २८९४५ रु. समजा, २९ हजार रु. ज्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये आयकरामध्ये सूट आहे आणि परतावा आयकरमुक्त आहे त्यामध्ये ही २९००० रु.ची रक्कम दरवर्षी गुंतविली तर २५ वर्षांनी म्हणजे त्या व्यक्तीच्या ५५ व्या वर्षी तिला २५,९४,४७६ रु. इतकी रक्कम प्राप्त होते. ही रक्कम पुढील पाच वर्षे आयकर वजा जाता केवळ ६% परतावा मिळेल अशा गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतविली तर त्या व्यक्तीच्या साठाव्या वर्षी ३४,७१,९९४ रु.ची आयकरमुक्त अशी गंगाजळी तयार होते.
अविवा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ आहे ८४.२०% या बाबतीत भारतामधील पहिल्या दोन क्रमांकाच्या कंपन्यांमध्ये त्या व्यक्तीने १ कोटी रु.ची ३० वर्षे टर्मची पॉलिसी घेतली तर काय होते ते पाहूया.
कंपनी क्र. १ - क्लेम सेटलमेंट रेशिओ ९७.१%. वार्षिक प्रीमियम ३३,६०० रु. (अधिक सव्‍‌र्हिस टॅक्स) एकूण प्रीमियमची रक्कम १०,०८,००० रु. ही रक्कम अविवा लाइफ शिल्ड अ‍ॅडव्हान्टेजच्या एकूण रकमेपेक्षा ३६,००० रु.नी जास्त आहे आणि मॅच्युरिटीला परत मिळणार नाही. त्यामुळे या पॉलिसीबाबत विचार करणे नुकसानीचे आहे.
कंपनी क्र. २ - क्लेम सेटलमेंट रेशिओ ९५.४%. वार्षिक प्रीमियम १०९७१ रु. तीस वर्षांच्या प्रीमियमची एकूण रक्कम ३,२९,१३० रु. बचत ६,४२,८७० रु. ही रक्कम २५ वर्षांमध्ये विभागली तर वार्षिक रक्कम होते २५,७१४ रु. समजा २५,७०० रु. दरवर्षी ही रक्कम वरीलप्रमाणे ‘सेफ’ पर्यायामध्ये गुंतविली तर २५ वर्षांनी २२,९९,२४२ रु.ची गंगाजळी तयार होते. पुढील पाच वर्षे ही रक्कम आयकर वजा जाता निव्वळ ६% परताव्याच्या पर्यायामध्ये गुंतविली तर सदर व्यक्तीजवळ वयाच्या साठाव्या वर्षी आयकरमुक्त अशी ३०,७६,९०१ रु.ची पूंजी तयार होते.    
(या लेखामागील उद्देश पूर्णत: समीक्षात्मक आहे आणि माहिती त्या त्या कंपन्यांच्या वेबस्थळावरून घेतली आहे.)