सो कुल : सारे भारतीय माझे बांधव..? Print

सोनाली कुलकर्णी, शुक्रवार , २४, ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

कविवर्य रामदास फुटाणेंची एक उपहासात्मक कविता ‘भारत कधी कधी माझा देश आहे’- फार गाजली. प्रत्येक कविसंमेलनात, कार्यक्रमात या कवितेनी टाळी आणि वन्समोअर घेतला. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची ही कविता- आज अधिकच ताजी वाटायला लागली आहे- ही किती लाजिरवाणी वस्तुस्थिती आहे.
आज तिचा काही उल्लेखही नाहीए पेपरमध्ये. संपली ती. फिनिश्ड. शुक्रवारी सकाळी ती होती. दैनंदिन कामं करत होती. जगत होती. तिच्या भावविश्वातली सगळी माणसं तिच्याबद्दल निर्धास्त होती. कुणाच्याच मनात तिळमात्र शंका डोकावली नसेल. तुमच्या-माझ्या मित्र परिवारासारखे तेही आश्वस्त असतील. तर शनिवारचा दिवस उगवला. सकाळ झाली. आपण उठलो. पण ती. ती उठलीच नाही. तिला काळनिद्रा लागली होती. लागली नव्हती खरं म्हणजे. तिला जबरदस्तीनं काळनिद्रा देववली होती. एका कामांध माणसाच्या गलिच्छ हव्यासानी तिचा जीवच घेतला. असं म्हणतानासुद्धा शहारा येतोय अंगावर. त्या तरुण मुलीचा फोटोतला हसरा चेहरा पाठ सोडत नाहीए. तो चेहरा विचारतोय. माझी काय चूक होती???नुसती छेडछाड, बळजबरी नाही. तर वश झाली नाही म्हणून त्या माणसानं पंचवीस वर्षांच्या एका तरुण मुलीचा सरळ खून करून टाकला. किती भयावह आहे हे! जगण्याला खरंच जुगार मानायचं की काय? आज आहोत. उद्या नसूही शकतो. कारण काहीही असेल. रझा अकादमीची दंगल होईल. बॉम्बस्फोट होतील. जीवे मारले जाण्याचे बल्क एसएमएस येतील. डोक्यात झाड कोसळेल,  मित्र किडनॅप करून पैशासाठी आपल्याला भोसकून मारतील किंवा वासनेनी पछाडलेल्या एखाद्या नतद्रष्टाला अप्राप्य म्हणून आपल्याला मरावं लागेल. हाच आहे का तो देश.. जो स्वतंत्र व्हावा म्हणून काही पिढय़ा तळमळल्या, लढल्या, शहीद झाल्या.. हाच का तो देश. जिथे गांधी नावाचा एक महात्मा संत होता. ज्यांनी आख्ख्या जगाला अहिंसेचा मंत्र शिकवला. देशासाठी प्राणाची आहुती देण्याची, समर्पणाची भावना कुठे. आणि स्वत:चे वैषयिक चोचले पुरवण्यासाठी एका स्त्रीचा जीव घेण्याचीही तयारी ठेवण्याचा पाशवीपणा कुठे.असं वाटतंय-फाडून टाकावी सगळी वर्तमानपत्र. ती बातमी असलेली. बंद करावेत टी. व्ही. नका. नका सांगू पुन्हा पुन्हा की किती तडफडून जीव गेला पल्लवी पुरकायस्थचा. उच्चशिक्षित कुटुंबातून आलेल्या या महत्त्वाकांक्षी तरुण मुलीला बावीस वर्षांच्या एका फडतूस वॉचमननी मारलं. जीवे मारलं. आपल्यालाच जर इतकं हतबल वाटत असेल चिडीनी. तर तिच्या कुटुंबीयांना, स्नेह्य़ांना काय वाटत असेल?तू मला फ्रेण्डशिप दे. लाईन दे. नाहीतर हे मी टाकतो अ‍ॅसिड तुझ्या तोंडावर. हो विद्रूप. हे बघ भर चौकात भोसकून तुझा कोथळा बाहेर काढतो तुझा. करतोच बलात्कार. घेतोच जीव. बघू कोण थांबवतंय मला.! मुंबई, पुणे, सांगली, दिल्ली. कुठलंही शहर असो. सातत्यांनी चालूच आहे हिंसाचार. नुसतं हळहळून आणि चर्चा करून काय उपाय निघणार अशा कृत्यांना? असल्या हीन, आततायी वृत्तीला वचक बसवण्यासाठी आपली न्याय व्यवस्था काय करते आहे? का आपण जरब बसेल अशी शिक्षा करत नाही गुन्हेगाराला? का वर्षांनुवर्ष रेंगाळत राहतात अशा केसेस? अशी सणसणीत शिक्षा फर्मावली पाहिजे. की पुढच्या दहा पिढय़ांमध्ये त्रास देणं दूर कुठल्या मुलीकडे नजर उचलून बघायची हिंमत नाही झाली पाहिजे कुणाची!सावरणे, पांघरूण घालणे, पैसे खाणे, निर्णय बदलणे, साक्षीदार फितवणे, वकील पळवणे अशा निर्लज्ज सर्कसमध्ये फसलाय आपला देश. खोटेपणा झाकायला इतके कष्ट घेतोय आपण. अरे माणुसकीची चाड असलेला कुणी एखादा खरेपणासाठी का उभा राहत नाही? लाजा नाही का वाटत अशा भेकड माणसांना.? स्वत:च्या शारीरिक विकृती, गरजा, दुबळेपणा तुम्ही स्त्रियांवर बळजोरी करून का प्रदर्शित करताय? संतापानी रडू फुटतंय बळी गेलेल्या मुलींसाठी. किती मागासल्यासारखे जगतोय आपण. लैंगिक शिक्षणाचं महत्त्व कधी कळणार आपल्या देशाला? गणितात शंभरपैकी शंभर मार्क मिळाले पाहिजेत, बोर्डात आलं पाहिजे, एक कोटी रुपये मिळवले पाहिजेत, अमेरिकेला गेलं पाहिजे हे सगळं आपली शिक्षणव्यवस्था शिकवते. तर सगळ्यात प्राथमिक-आपलं शरीर. आपली शू आणि शीची जागा, त्याबद्दलची जागरूकता, त्याचं कार्य, महत्त्व, पौगंडावस्था म्हणजे काय., हार्मोनल बदल म्हणजे काय. हे धडे पुस्तकांमध्ये कधी येणार? हे विषय आपण वज्र्य करत राहिलो तर त्याबद्दलचं कुतूहल वाढत राहणार. त्याबद्दल गुपचूप गप्पाच होणार. त्याला अश्लीलतेचा वास येत राहणार. शिक्षण हे फक्त मतदान करण्यासाठी महत्त्वाचं नाही. लैंगिक शिक्षणापासून जितकी अनभिज्ञता राहील तितकंच लैंगिक शोषण वाढत राहील. आजही मुलींना प्रेगनन्सीबद्दल संपूर्ण माहिती नसते. मासिक पाळी टाळूच शकत नाही त्यामुळे ती ओळखीची होत जाते. पण बाळ होणं- हे मूल जन्माला घातल्याशिवाय कळत नाही. लोकसंख्या वाढत चालली आहे. पण शारीरिक जडणघडणींमधली शास्त्रीय रचना, दृष्टिकोन हे समजण्याचा बहुतांश अभावच आहे. काही विषय उघडपणे बोलले गेलेच पाहिजेत. नाहीतर सिनेमातल्या व्हिलनला लाजवतील असे नतद्रष्ट पव्हर्ट लोक आपल्यातल्या कोवळ्या पोरीबाळींचा जीव घेत राहतील. राखीपौर्णिमेच्या पाश्र्वभूमीवर आणि पंधरा ऑगस्टच्या कागदी झेंडय़ांना लपवत, मान खाली घालून, घळाघळा रडत, आपल्याला कुजबुजत म्हणावं लागेल.. ‘‘माफ कर पल्लवी पुरकायस्थ. भारत कधी कधीच माझा देश आहे....’’ क्षमाशील आणि सहिष्णु असण्याचा शाप लागलाय आपल्या न्यायव्यवस्थेला. कधीतरी गुन्हेगाराला कडक शासन करायची धमक येईल आपल्यात. ती आल्यावर आम्ही तुला श्रद्धांजली वाहायला पात्र होऊ. तोपर्यंत फक्त दिलगिरी आणि डोळ्यातलं पाणी...