सो कुल : पुस्तकाचं गाव Print

सोनाली कुलकर्णी, शुक्रवार ३१ ऑगस्ट २०१२
alt This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
तीन महिन्यांपुर्वी नवा बुक शेल्फ बसवुन घेतला. कुणाला पाहिजेत बंगले आणि गाडय़ा. एक पुस्तक उघडलं की हव्या त्या सफरीवर जाता येतं. त्यातलीच ही काही.
तारा वनारसे गेल्या. अशी बातमी गेल्या वर्षी वर्तमानपत्रात वाचायला मिळाली. मी त्यांचं लेखन कधी कधी वाचलं नव्हतं. पण त्यांच्यावरचे जे काही श्रद्धांजलीचे लेख वाचले. त्यांनी कुतूहल चाळवलं गेलं. त्यांचं व्यक्तिमत्त्व फार प्रगल्भ वाटलं. त्यासमोर स्वत:बद्दल प्रेमळ तुच्छता वाटली. किती कस्पटासमान आहे आपलं ज्ञान आणि माहिती. अजून वाचण्यासारखं, शिकण्यासारखं खूप काही आहे हे जाणवून एक फ्रेश उत्साहही आला. त्यादरम्यान मी पाल्र्यात मॅजेस्टिकच्या ग्रंथदालनात गेले होते. नाव वेगळं वाटलं, मुखपृष्ठ वेध घेणारं होतं म्हणून ‘श्यामिनी’ नावाचं तारा वनारसेंनी लिहिलेलं पुस्तक विकत घेतलं. गेल्या महिन्यात ते वाचायला मुहूर्त निघाला.
किती अप्रतिम मराठी आहे या लेखिकेचं. किती अद्भुत नवनवीन शब्द त्यांनी शोधून काढले आहेत. एका स्त्री लेखिकेनं स्त्रीसौंदर्याचं इतक्या विपुल शब्दांत, रसिक दृष्टिकोनात केलेलं वर्णन फार क्वचित वाचायला मिळतं. काही पौराणिक व्यक्तिरेखा ठोकळेबाज पद्धतीनं मनावर कोरल्या गेलेल्या असतात. रूढार्थानं लोकप्रिय, सर्वश्रुत असलेल्या कथानकाचा मुक्त कल्पनाविस्तार करणं ही कमालीची अवघड गोष्ट वाटते मला. एक तर त्यासाठी इतिहासाशी पंगा घेणं आलं. शिवाय सखोल विचार करून आपलं वेगळं मत मांडण्याचं धाडस हवं. हे शिवधनुष्य तारा वनारसे लीलया पेलतात. मला प्लॉट सांगून टाकावा असं वाटत नाहीए. तुम्ही नक्की वाचा हे पुस्तक.
वाचता वाचता आपल्याला निसर्ग अक्षरश: दिसतो. गंध येतात. स्पर्श जाणवतो. म्हणजे अनवाणी पावलाचा दगड आणि मातीतली पाऊलवाट यातला फरक वाचतानाही अनुभवल्यासारखा वाटतो. जात, धर्म, वर्ण ह्याचं ह्य़ाचं इतकं सूचक आणि व्यापक प्रतिबिंब उमटलंय. आपले जसजसे पावसाळे सरत जातात तसं रामायण ही फक्त एका त्यागी, एकपत्नीव्रती राजाची नुसती यशोगाथा नाही वाटत. अनेक प्रश्न पडतात. प्रसंगी नवल वाटतं; रागही येतो. या अशा क्वचित आणि वरवर वाटण्याला तारा वनारसेंनी फार खोल बुडी मारून हलवलं आहे. एखाद्या गप्पासत्रामध्ये, नवा मुद्दा मांडून, पंधरा मिनिटं ऊहापोह करण्याचा चतुरपणा असणं म्हणजे आपलं मत किंवा विचारधारा का. असे कळीचे प्रश्न पडले आहेत या पुस्तकामुळे मला.
त्याचबरोबर प्रेम आणि अधिकारऱ्याचाही नव्याने विचार करायला भाग पाडते लेखिका. मोठय़ा ताकदीनं त्यांनी काळ उभा केला आहे. त्यांचं स्तिमित व्हायला लावणारं कल्पनारंजन वाचताना अगदी सहज वाटतं. वास्तू, वस्तू, हेवा, रूप, गर्व. अशा कशाकशावर त्यांनी हलकेच प्रकाशझोत टाकलाय. कथेचा ओघ इतका नैसर्गिक आहे, की का कोण जाणे. आपणही त्या वातावरणात झाड म्हणून, पक्षी म्हणून, आभाळ म्हणून कुठं तरी उपस्थित आहोत, असं वाटायला लागतं. परिणामी त्यातली वेदना पिसासारखी अलगद आपल्यावर येऊन क्षणभर विसावते. आणि आपण आंतरबाह्य़ थरथरून जातो.
अधिक काळ लंडनमध्ये वास्तव्य असणारी ही लेखिका आता आपल्यात नाही. पण त्यांची ‘श्यामिनी’ अजरामर आहे. कुणाला ही पोचपावती द्यावी कळत नाही. त्यांच्या कुटुंबाला. मित्रपरिवाराला. पण मौज प्रकाशनाला तर नक्कीच. फार सुंदर पुस्तक काढलंय तुम्ही. पद्मा सहस्रबुद्धेंचं मुखपृष्ठ तर फार फार अर्थपूर्ण आहे. हे पुस्तक वाचलंच पाहिजे.
 ०**  आता सध्या माझं वाचून होत आलंय डॉ. रवी बापट आणि सुनीती जैन यांचं. ‘पोस्टमार्टम’ अर्थात सडेतोड गप्पा डॉ. रवी बापट यांच्याशी. यात सुनीती जैन यांनी रवी बापटांवर चौफेर गोलंदाजी केली आहे. आणि बापटांनी प्रत्येक मुद्दय़ावर सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत उत्तरं देत आपल्या अनुभवाचे चौकार, षटकार आणि सेंच्युऱ्या मारल्या आहेत. पुस्तकात डॉक्टरांचा संपूर्ण जीवनपट उलगडतो. एका डॉक्टरचं वैद्यकीय शिक्षण, उपचार, तपासण्या, नैतिक मूल्य याबद्दल ते स्पष्ट बोलतात. पुस्तकाची भाषा फार बोलकी आहे. त्यासाठी शब्दांकन करणाऱ्या सुनीती जैन यांचं कौतुक वाटतंय. कारण समोरच्या माणसाचं ओघवतं कथाकथन आपण जुळवून घ्यायचं, एडिट करायचं, प्रसंगी समानार्थी शब्द- भावना शोधायच्या हे काम वाटतं तितकं सोपं नाही. डॉक्टरीशी संबंध नसलेल्या माणसांनाही हे पुस्तक आपलंसं करून घेतं. साधी गोष्ट- मेटाबॉलिझम, मेटाबॉलिकरेट हे शब्द आजच्या डाएटिंगच्या युगात इतके वापरले जातायत. त्याला मराठीत चयापचय क्रिया म्हणतात ही साधी, पण महत्त्वाची गोष्ट मला या पुस्तकामुळे कळली. आता वाचण्यासाठी नेक्स्ट इन् लाइन आहे- या लेखकद्वयीचं ‘वॉर्ड नंबर पाच- केईएम’.
मेडिकल सायन्सचा बाऊ न करता, इतरांना कमी न लेखता, स्वत:च ज्ञान, माणूसपण मुक्तहस्ते मांडणारे डॉ. रवी बापट किंवा डॉ. वि. ना. श्रीखंडेंसारखे लेखक आपल्याला खूप काही शिकवून जातात. अंतर्मुख करतात. स्वत:च्या व्यापातून वेळ काढून, न कंटाळता पुस्तक लिहिल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार.