सो कुल : विसरण्यासाठी रिमाइण्डर Print

शुक्रवार १४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt alt

परफेक्शनिस्ट हा जरा टोकाचा शब्द झाला. वक्तशीर, टापटिपीत, चोख असणे ही काही जणांची गरज असते. तो स्वभावच होऊन बसतो. पण हॅलो. त्यासाठी एनर्जीही खूप इन्व्हेस्ट करावी लागते.
मध्ये एकदा एक मैत्रीण बरसलीच माझ्यावर अनपेक्षितपणे. ‘‘काय गं. तू काही विसरत कशी नाहीस? बघावं तेव्हा सगळं बरोबर न विसरता करतेस अगदी!’’ मी हसून म्हटलं, ‘‘अगं, ही तर कॉम्प्लिमेन्ट झाली. तू रुसक्या स्वरात का म्हणतीएस?’’ ती म्हणाली, ‘‘अजिबात नाही. फार हाय स्टॅण्डर्ड्स सेट होतात तुझ्या लक्षात ठेवण्याच्या स्वभावामुळे. माझ्यावर फार प्रेशर येतं नेहमी!’’ मी चकितच झाले. आपण आपल्या वाईट सवयी सुधारण्याबद्दल अनेकदा विचार करतो, पण चांगल्या सवयींना गृहीतच धरतो.
यावर गोंधळून जाऊन, आठय़ा घालून बराच केला मी आणि मैत्रिणीच्या बोलण्यातलं तथ्य(?!) जाणवलं. त्यातून एक इच्छा जन्माला आली. इच्छा कसली. स्वप्नच म्हणा ना. काही तरी विसरण्याचं स्वप्न. व्यवस्थित असण्याचं व्यसनच जडलंय मला. फॅन बिघडला? बोलवावं इलेक्ट्रिशिअन- दुसऱ्या दिवशी दुरुस्त करून घे. चहाच्या भांडय़ाचा प्लॅस्टिकचा दांडा जळला कुणाच्या तरी हातून- ताबडतोब दुसरा बसवून आण. तुटलं बटण- शिवून टाक. पर्सचा/ बॅगचा बंद तुटला- आण जोडून. अशी सगळी कामं वेळच्या वेळी करायला मला फार बरं वाटतं.
याचा तसा दैनंदिन गोष्टींसाठी, जगण्यासाठी खूप उपयोगही होतो. आपण जास्त जबाबदार होतो, तत्पर होतो. शिवाय आपलं वारं सोबतच्या माणसांनाही लागू शकतं- त्याचा फायदा आपल्या घराला किंवा ऑफिसला होतो. इलाज शोधण्याच्या वृत्तीमुळे रोजच्या लहानसहान गोष्टींचा बाऊ वाटत नाही. उलट त्या सोडविताना एक खेळकरपणा येतो आपल्यात. आता या आठवडय़ात काय बाबा दुरुस्त करायचंय. असा. कारण घरातले प्रश्न काही एकदा निस्तरून थांबत नाहीत. नळच गळायला लागतो, चप्पल तुटते, छत्री मोडते, लॅच बिघडतं. काही ना काही सतत उद्भवत राहतं.
पण असल्या या दक्ष स्वभावाचा उपयोग काय, असं मला हल्ली वाटायला लागलंय. बाकीची माणसं आपल्या गोष्टी लक्षात ठेवण्याला, वेळेवर करण्याला गृहीत धरतात. ते कारचं पीयूसी असो की आदल्या आठवडय़ात आणलेली पालेभाजी! ड्रायव्हरपासून कूकपर्यंत सगळ्यांना असं वाटतं की, आपण कशाला काही लक्षात ठेवायच्या फंदात पडायचं? आहेच की सोनाली आठवण करून द्यायला. मध्ये एकदा पेट्रोल संपत असल्यामुळे कारचा लाल दिवा पकपक करायला लागला. घरात मोहरीचे दाणे आणि तूरडाळ ठणठण झाले होते. कणीक दोन फुलके (मुंबईत फुलकेच! पोळ्या नशिबात नाहीत.) होतील एवढी नावाला उरली होती. त्यात कपडे धुवायची पावडर संपलीए- मग आज वॉशिंग मशीन लावतच नाही- असं काम करणाऱ्या ताईंचं वाक्य कानावर आलं- आणि मी हादरलेच!
हाऊसकीपिंग, स्वयंपाकघर, इस्त्रीचे कपडे, किराणा सामान, बिलं, गाडीचा मेन्टेनन्स हे तर झालंच. शिवाय आपल्या कामाच्या गोष्टी. कॉन्ट्रॅक्ट्स, कॉस्च्युम्स, मेकअप, हेअर ड्रेसिंगच्या वस्तू, चपला-बूट हे सगळंही आपणच बघायचं. शिवाय व्यवसाय असा- त्यामुळे इन्कम टॅक्ससाठी बिलं जपायची, टीडीएस सर्टिफिकेट मागत बसायचं, लोकांनी वेळेवर न दिलेले पैसे वसूल करण्यासाठी तगादा लावत बसायचं.. किती कामं असतात! बरं या सगळ्या विविध कामांसाठी मदत म्हणून असिस्टन्ट ठेवले- तर झालंच. त्यातले अनेक जण आपली बुद्धी गहाण टाकूनच येणार- त्यामुळे पुन्हा त्यांना आठवण करून देत बसायचं. न संपणाऱ्या चक्रवाढ व्याजासारखं अविरत चक्रच.
याउलट अशी विधानं किती छान वाटतात. ‘‘अरे, विसरलोच बघ मी तुझी कॉपी आणायला..’’
‘‘ओह. आज हा सीन करायचा आहे का आपण.’’
‘‘हा मैडम, आपने बोला था. लेकीन मई भूलही गया.’’
‘‘येस येस यू आर राईट. बट..’’
साधं दर आठवडय़ाला शनिवार-रविवारची जास्तीची सांगितलेली वर्तमानपत्रं टाकायला विसरतो पेपरवाला. पण बिल मात्र पूर्ण मांडायला विसरत नाही. तरी अशा माणसांचं काहीही बिघडत नाही. त्यांचं उखळ कायम पांढरं होतं राहतं, पण काटेकोर माणसांचं मात्र धडपड करून रक्त आटत राहतं.
आता या परिस्थितीवर मात करण्यासाठी मी लक्षात ठेवून स्वत:च्या तंद्रीत असायचं ठरवलंय. काही नाही. खिडकीबाहेर बघत चहाच पीत बसायचं. किंवा पुस्तक वाचण्यात मुद्दाम एवढं गुंग व्हायचं. की मीटिंग, अपॉइन्टमेन्ट वगैरे विसरूनच जायचं. मग नंतर अय्या. खरंच की. सॉऽऽरी.. असं स्टाइलमध्ये म्हणायचं. छे छे छे. कसलं यश येणार असल्या नाकर्त्यां प्लॅनला! विसरणंसुद्धा लक्षात ठेवायचं म्हणे
 असो. त्यापेक्षा आपला व्यवस्थितपणाचा सोस मान्य करावा आणि त्याच्या परिणामांना सिद्ध राहावं झालं. सॉरी गं मैत्रिणे. पण आय अ‍ॅम लाइक दॅट ओन्ली.