सो कुल : टिपेचा सूर Print

शुक्रवार , २१ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altदेवळात जाताना घंटा वाजवण्याइतका बाहेर गेल्यावर टीप देणं स्वाभाविक होऊन बसलंय हल्ली! त्या उलट पुण्यातल्या माझ्या फेवरेट पार्लरमध्ये टीप घेणार नाही अशी नम्र सूचना आहे.
बील आलं. कोण देणार, ह्यावर आमची जरा चढाओढ झाली. मग ज्याचा वाढदिवस-त्यानीच द्यायची ट्रीट असं मान्य झालं. आम्ही दहा जण होतो. बील झालं साडेनऊ हजार रुपये. बीलाच्या पैशाबरोबर माझ्या मित्रांनी टिप म्हणून पाचशेची नोट त्या लेदरच्या कव्हरमध्ये सरकवली सहजपणे. तो म्हणाला, ‘बास ना पाचशे?’ मग बाकी सगळ्यांनी तोंडी हिशेब केला- साधारण दहा टक्के म्हणजे पाचशे रुपये बरोबर आहेत. पा.च.शे???
मला नेहमी गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की. ‘टिप देणे.’ का म्हणून टिप द्यायची कोणाला? वेटर म्हणून काम करणाऱ्यांना हॉटेलचे मालक पगार देत नाहीत का? की आपलीच जबाबदारी आहे त्यांना पोसण्याची? युरोप-अमेरिकेत बऱ्याच वेळेला शिकाऊ मुलं स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी हॉटेलमध्ये काम करतात. तिथल्या रेस्टॉरंटस्मध्ये चक्क पाटी लिहिलेली असते- बीलात दहा टक्के टिपेची रक्कम जोडली जाईल किंवा येथील वेटर्स विद्यार्थी आहेत- त्यांना स्वेच्छेनी जास्तीत जास्त टीप द्या. मी स्वत:च विद्यार्थी असताना जेवणाच्या भत्त्यातले पैसे वाचवून जमतील तेवढी ब्रॉडवेची नाटकं, कॉन्सर्ट किंवा सिनेमे बघायचे. परवडेल एवढय़ा तिकिटात- शेवटून दुसऱ्या तिसऱ्या रांगेत बसून वगैरे. अशावेळी इतर विद्यार्थ्यांना-पद्धत म्हणून टिप देण्याचं प्रकरण फारच गैरसोयीचं वाटायचं.
भलं होऊ दे म्हणा त्या वेटरांचं. त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी वरकमाईची गरज असत असेल. पण खूप जणं इम्प्रेशन मारण्यासाठी दणकट टिप देतात. हल्ली ब्युटीपार्लर किंवा स्पामध्ये पण सगळे जण सटासट शंभरच्या नोटा काढून देतात. गोड हसत ते सेवक नम्रपणे टिपा स्वीकारतात. त्यांनी चांगलं अटेण्ड केलं किंवा आपल्याला हवा तसा फूटमसाज केला-म्हणून बिलाच्या व्यतिरिक्त (एवढे) पैसे द्यायला आपण बांधील आहोत का? आपणही नुसतं हसून निघू शकत नाही का? पण अलीकडे हे कल्चरच झालंय- टू टिप.
चांगलं केलंत हो तुम्ही माझ्या नातलगाचं ऑपरेशन- म्हणून कुठल्या डॉक्टरला देऊ करतो का आपण टिप? किंवा नर्सला तरी. डॉक्टर असतील श्रीमंत. पण बिचारी नर्स तर पोटासाठीच जॉब करत असेल ना? विमानानी जाताना सुखरूप उतरल्याबद्दल पायलटला देतो का पैसे? किंवा एअर होस्टना? मागितल्यावर लगेच गार नसलेलं साधं पाणी किंवा जेवण दिल्याबद्दल? पेट्रोलपंपावर शून्य बघायच्या आधी सप्लाय सुरू केलात म्हणून तिथल्या कामगारांशी हुज्जत घालतात माणसं. त्याउलट फुकट असलेल्या हवा भरणे/काच पुसणे ही कामं करणाऱ्याला पाच दहा रुपये तोऱ्यात देतात. पेट्रोल भरणाऱ्याला देतात का कधी सहज म्हणून दोन रुपये तरी?
अर्थात मला हे सगळे विचार त्रस्त करतायत कारण मला अजिबात स्टाइलमध्ये टिप देता येत नाही. ती ग्रेसच येत नाही मला. हॉटेलमध्ये गुपचुप टिप देणं- आता शिकलीए मी. म्हणजे दहा टक्के वगैरे वगैरे. पण पार्लरमध्ये कुणाच्या हातात पैसे देणं जमायचंच नाही मला. वाईट दिसू नये असंही वाटायचं. त्यामुळे मी गल्ल्यावरच्या मुलीला विनंती करायचे- हे पैसे तू नंतर माझं फेशिअल जिनी केलं त्या मारियाला देशील का प्लीज म्हणून. फक्त चांगलं वागल्याबद्दल किंवा स्वत:चं काम नीट केल्याबद्दल- विशिष्ट प्रोफेशन्समध्ये पैसे देऊ करण्याची काय फॅशन आहे ही?
त्यापेक्षा लक्षात ठेवून त्या माणसासाठी काहीतरी करावंसं वाटतं. मारियाचं लग्न ठरलं तेव्हा मी एक पंजाबी ड्रेस भेट म्हणून घेतला. आमचे गेल्या काही वर्षांतले ऋणानुबंध आहेत. पण अनोळखी वेटरला पद्धत म्हणून आहेर करण्याची इच्छाच होत नाही बुवा. हा टिपिकल मराठी कंजूसपणा आहे की काय कोण जाणे. फाइव्हस्टार हॉटेलमध्ये पार्किंगवाला आपली गाडी घेऊन यायचा अवकाश. दहा, वीस, पन्नास, शंभरच्या नोटा तयारच असतात लोकांच्या हातात. क्षणिक आदर दाखवत उतरून आपल्यासाठी दार उघडणाऱ्या तिऱ्हाईत माणसावर आपण लगेच कशा नोटा उधळतो? गाडीतले गॉगल. टिश्यूपेपर, पाण्याच्या बाटल्या न चोरल्याबद्दल? रोज विश्वासानी नीट गाडी चालवणाऱ्या, वेळेवर येणाऱ्या आपल्या ड्रायव्हरला दिले जातात का कधी काही पैसे- उगीचच म्हणून?
खरंच टिप आपण आधी आपल्या कायमस्वरूपी स्टाफला द्यायला पाहिजे. पाहुणे येणार असले तर येते ना आपली पोळीवाली बाई? करते ना एक्स्ट्रा दहा पोळ्या? तिच्यासाठी का नाही ढिला होत हात? का तिचे गेल्या महिन्यातले खाडे मोजले जातात? पोस्टमन दिवाळी मागायला आले तर चढल्याच कपाळावर आठय़ा. का? देतात ना ते आपली महत्त्वाची पत्रं न चुरगळता- आणि वेळेवर वगैरे? यंदा तर आम्ही आमच्या कुरिअरवाल्यांना पण दिली दिवाळी बक्षिसी. ते येतं मला. पण टिप.?!
मला का नाही कुणी दिग्दर्शक/ प्रोडय़ुसर टिप देत? चांगला शॉट दिल्याबद्दल किंवा कंटिन्युईटी लक्षात ठेवल्याबद्दल? ते काय म्हणत असतील, - की ठरलेलं मानधन देणारच आहोत ना आम्ही! किंवा मेकअपमन, लाइटबॉय, ट्रॉलीवाले- ह्य़ांना कुणाला तरी देतात का टीप? तसं मग हॉटेल-पार्लरमधल्यांना मानधन/पगार असतोच की. तिथे का बरं नियम बदलतात? लाइट बंद झाला म्हणून हातानी, कौशल्यानी सिग्नलची वाहतूक सांभाळल्याबद्दल ट्रॅफिक पोलिसांना देतो का आपण टिप? ते घेतात ती मानहानीकारक लाच- आणि वेटरला आपणहून देतो- ती टिप काय? कुणी ठरवलं हे सगळं? बसमधल्या कंडक्टरवर सुट्टय़ा पैशांसाठी आपण वैतागतो, खेकसतो. त्यांना प्रेमानी कधीतरी देतो का शंभराची नोट कधी?
हे विचार मनात चलबिचल घडवत असले. तरी बंडखोर व्हायला धजावत नाही मन. देणारच नाही आता टिप असं ठरवून हॉटेलमध्ये जाता येत नाही. आणि चुकून तसं मनाशी पक्कं करून गेलो. तर नेमकं वेटर म्हणून एखादा मलूल चेहऱ्याचा बापुडवाणा माणूस येतो. झालं!. येतातच लगेच आपल्या झाडाला पैसे!