सो कुल : जॉय ऑफ गिव्हिंग वीक Print

शुक्रवार , २८ सप्टेंबर २०१२
altदेणाऱ्याने देत जावे.. घेणाऱ्याने घेत जावे.. घेता घेता एक दिवस.. देणाऱ्याचे हातच घ्यावे.. विं. दा. करंदीकर
आपल्याकडे अशा अनेक वस्तू असतात. ज्याचं काय करावं हे आपल्याला समजत नाही. आता न बसणारे नवे कपडे. ते कुणाला धड भेट देता येत नाहीत-किंवा मैत्रिणींना घे ना गं. मला जरा लहान होतोय हा टॉप. असं म्हणायला हल्ली आपण धजावत नाही. कपबश्या, लॅम्पशेड, चपला- बूट, कपडे, बेडशीट.. नवीन वस्तू आणल्याच जातात भारंभार. हे आपण नवे विकत घेतो तेव्हा जुने काही फाटले किंवा फुटलेलेच असतात असं नाही. मग तो जुन्याचा ढीग ठेवायचा कुठे हा प्रश्न येतो. घरी काम करणाऱ्यांना विनंती करून बऱ्याचशा दिल्या तरीही अजून अनेक उरतातच. अमेरिकेत जसं म्युझिक सिस्टम, फर्निचरपासून थेट कारसारख्या वस्तू गार्बेज म्हणून कचरा पेटीपाशी ठेवून टाकलेल्या दिसतात, तसं करणं नाही होत आपल्या हातून. तशी भारताची आर्थिक भरभराट आणि नवश्रीमंतांची गर्दी पाहता ती वेळ काही लांब आहे असं वाटत नाही. पण सध्या तरी, खराब न झालेल्या, चांगल्या पण आपण वापरत नसलेल्या गोष्टींचं काय करायचं.. या सतावणाऱ्या प्रश्नाला मला अलीकडेच एक फॅण्टॅस्टिक पर्याय मिळाला.
प्रश्न पडला की उत्तर आपोआप आपल्याला शोधत येते. मला अचानक एक एसएमएस आला.. आम्ही ‘प्रयास- एक कोशिश’ नावाची ना नफा ना तोटा संघटना आहोत. तुमच्याकडे फेकून देण्यासारख्या काही गोष्टी असतील तर कृपया त्या तुम्ही आम्हाला देणगी म्हणून द्याल का? मला फारच कुतूहल वाटलं आणि मी त्या दिलेल्या नंबरवर अमरजितसिंग नावाच्या माणसाला फोन केला. मग अमर मला भेटायला आला.. त्याच्या संघटनेचं काम समजावून सांगायला. मुंबई शहरात अमरसारखे २५-३० तरुण स्वयंसेवक आहेत. ते घरोघरी जाऊन रद्दी, कॉस्मेटिक्स, औषधं, भांडीकुंडी, कपडे, पांघरूणं अशा सर्व प्रकारच्या वस्तू स्वीकारतात. नंतर या वस्तू योग्य त्या गरजू माणसांना किंवा संस्थांकडे पोचवतात. यात ते झोपडपट्टी आणि वेश्या वस्तीतल्या लहान मुलांसाठी अनेक उपक्रम चालवतात आणि चांगला अभ्यास/ खेळ/ स्पर्धा यासाठी बक्षीस म्हणून आपण टाकून दिलेल्या वस्तूंपैकी काही गोष्टी देतात. किती सत्पात्री दान ना..
मला नवलच वाटलं. निरुपयोगी वस्तूंचा इतका सदुपयोग होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी तयार केलेल्या चार-पाच गठ्ठय़ांना स्वत: अमर एका मोठय़ा पोतडीत काळजीपूर्वक भरून घेऊन गेला. नंतर आठवडाभरात त्याची मेल आली- ‘मिस कुलकर्णी तुमच्या देणगीबद्दल आभारी आहोत. त्या वस्तू खूप कामी आल्या. तुमच्या दयाळूपणाबद्दल धन्यवाद.’ मला लाजल्यासारखंच झालं. दयाळूपणा कसला? त्या तर सगळ्या मला नको असलेल्या वस्तू होत्या. त्या देऊन आपण दानशूर आहोत असं स्वत:ला काय भासवायचं, पण अमरचा माझ्याकडच्या वस्तू घेतानाचा नम्रपणा पाहून मला भरूनच आलं. कुणाच्या दृष्टींनी व्यर्थ वाटणारं काम तो आणि त्याची संघटना देवदूत असल्यासारखे तन्मयतेनं करतात. तुम्हाला कोशिश- एक प्रयास’च्या प्रयत्नात भाग घ्यायचाय?
मला हे का सांगावसं वाटतंय माहितीए? कारण दोन ऑक्टोबरपासून सुरू होतोय ‘जॉय ऑफ गिव्हिंग वीक’! चमकलात ना? सांगते.. माझ्या नवऱ्याला- नचिकेतला त्याचा आयआयएम अहमदाबाद (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट) मधला परममित्र वेंकट कृष्णन भेटायला आला. तोही नचिकेतच्याच बॅचचा. परदेशातल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांकडे पाठ फिरवून स्वत:ची वेगळी वाट शोधण्याची धमक असणारा. या दोघा मित्रांच्या गप्पा किती सृजनशील आणि भन्नाट असतील कल्पना करा. भारतातल्या सगळ्यात महत्त्वाच्या मॅनेजमेंट स्कूलचा हा टॉपर आता काय करत असेल? त्यानी ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ या संकल्पनेला स्वत:ला वाहून घेतलं आहे. आनंद- काही देऊ करण्यातला. त्याच्याबरोबर त्याचे विविध क्षेत्रातले सहकारी आहेत. ते भारतातल्या अनेक शहरांमध्ये काम करतात आणि कॉर्पोरेटस्, शाळा, कॉलेजांमध्ये ‘जॉय ऑफ गिव्हिंग’चा प्रचार करतात.
त्यांची वेबसाइट नक्की नक्की बघा. त्यात एक स्माईल डेक आहे. त्यात तुम्ही काय करू शकता, काय काय देऊ शकता याची एक प्रेमळ यादी आहे. घरी काम करणाऱ्या बाईला सरप्राईज सुट्टी देण्यापासून ते सार्वजनिक जागेतला एक पुतळा स्वच्छ करण्यापर्यंत अनेक युक्त्या या डेकमध्ये आहेत. वेंकटच्या बोलण्यात कुठेही प्रौढी नाही, वेळ निघून जात असल्यासारखी आग्रही गडबड नाही किंवा संधी साधण्याची, जाहिरात करण्याची उथळ धडपडही जाणवत नाही. त्याच्यामध्ये मला जाणवली, ती ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ या संकल्पनेबद्दलची प्रचंड निष्ठा. त्याच्यात मला आढळला तो समर्थ आत्मविश्वास- की हे ध्येय आहे माझ्या आयुष्याचं. काही देण्यामध्ये जो आनंद असतो, तो मी १०० टक्के सगळ्यांपर्यंत पोचवणारच!
दोन ते आठ ऑक्टोबर आहे जॉय ऑफ गिव्हिंग वीक. आतापर्यंत फादर, मदर, फ्रेंडशिप, व्हॅलेंटाईन असे बरेच ‘डे’ आणि सर्व आजारांपासून ते फॅशनपर्यंतचे ‘वीक’ प्रसिद्ध झालेले आपण पाहिले. हा नवा काहीतरी देण्याचा आठवडा साजरा करून बघू या. उत्सव करू या देण्याचा. मी तर तयार आहे या उत्सवात सामील व्हायला. तुम्ही? बोला काय देऊ शकता या वर्षी? रक्तदान, देहदान, पैसे, स्माईल, श्रम, वेळ की जादूची झप्पी? काहीही, अक्षरश: काही देऊ करणं स्वागतार्ह आहे. कंपन्यांचे मोठे अधिकारी पाच दहा लाख रुपये देतात, विद्यार्थी एक रुपया देतात, खेळाडू, शास्त्रज्ञ वेळ देऊ करतात. आपल्यालाही काहीतरी सुचेलच. देण्यासारखं काहीतरी मिळेलच. कारण देणं हे ऐपतीवर अवलंबून नसतं. देण्याच्या इच्छेवर अवलंबून असतं.
देणार अखेर आपण एकमेकांनाच. यातून सुधारणा, सुस्थिती येणार आपल्यातच. माणुसकीच वाढीला लागणार. आनंद वृद्धिंगत होणार. त्यासाठी कुणीतरी आपल्याला जागं करतंय. ती हाक ऐकू या. आपण स्वत:लासुद्धा काहीतरी देऊ शकतो. स्वत:पासून सुरुवात करून हृदयात मावणाऱ्या प्रेमाच्या प्रत्येक कणाला आपण वाटू शकतो. थँक्स वेंकट.. जॉय ऑफ गिव्हिंगची संकल्पना मांडल्याबद्दल.. हा आठवडा न भूतो न भविष्यति असा यशस्वी होवो.. होय, मला देणेकरी व्हायचं आहे. मला माझ्या अहंकाराला जरा हलवायचं आहे. आनंद देण्याच्या स्वाभाविक ऊर्मीला फुलवायचं आहे..
website : www.joyofgiviing week.org
email - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it