सो कुल : जा. जा. जा.!! Print

alt

सोनाली कुलकर्णी , शुक्रवार , २६ ऑक्टोबर २०१२
पहले प्यार की पहली चिठ्ठी. योग्य माणसाकडे नेऊन देण्याचा सुज्ञपणा खरंच होता का यांच्या डीपार्टमेंटमध्ये.? की हे एक तद्दन कल्पनारंजन फक्त.?
आपण प्राणी पाळावे असे मला कधीच वाटलं नाही. फ्लॅटच्या सीमित क्षेत्रफळात कुत्र्यामांजरांना डांबून ठेवणं. आणि आपल्याला वेळ असेल तेव्हा त्यांना ‘फिरायला’ नेणं- तेही मुख्यत: त्यांच्या नैसर्गिक विधींसाठी!. हे काही मला पटत नाही. असो. हे माझं वाटणं झालं. मॉडर्न स्टडी वगैरे गोष्टी-भावनिक संतुलनासाठी.प्राणी पाळा. मासे बघा. कुत्र्यांना थोपटा. चिमण्यांना पाणी घाला. असले अनेक सल्ले देत असतात. त्याचाही एव्हाना धसका घेतलाय मी. कारण मधे एके ठिकाणी नामशेष होणाऱ्या चिमण्यांची प्रजा वाढवण्यासाठी बनवलेली लाकडी घरटी बघायला मिळाली. लगेच निसर्ग, पक्षी यांचा कळवळा वाटून घेतलीच मी विकत ती घरटी. पण खेदजनक बाब अशी.

की ते घरटं मी माझ्या खिडकीतल्या बागेत ठेवल्यापासून कधीही चिऊताई तिकडे फिरकल्या नाहीत. उलट कबूतरंच त्याच्या आसपास अंडी घालायला लागली. कुत्री, मांजरं, ससे, कासव, पोपट इ. प्राणीमात्र पाळणाऱ्यांची मानसिकता मी जरा तरी समजू शकते. पण कबूतरं आवडणारी माणसं.. सॉरीच प्लीज!
कबूतर या पक्ष्यात एक निव्वळ बावळटपणा भरलाय असं मला वाटतं. आपल्या देहाचा डोलारा आणि फुगवटा लक्षात न घेता कुठल्यातरी फटीमधून कुठेतरी घुसतात. मग बाहेर पडायचा रस्ता विसरतात. आणि त्या धडपडीत पंखांची अखंड फडफड करत राहतात. आपण कधी नव्हे ते दुपारी पंधरा मिनिटं पडायचं ठरवलं, तर नेमकं आपल्या डोक्यापाशी असलेली खिडकी किंवा पॅरापेट पकडतात आणि कारण नसताना जागच्या जागी नाचायला लागतात. या नाचरेपणाच्या आवाजाला किंवा कृत्याला ‘फडफड’ शिवाय दुसरा शब्द नाही. आपल्याला काही सुचत नसेल तर आपण काहीतरीच करत बसतो. तसे हे कायम न सुचण्याच्या मोडमध्ये असतात. काहीच क्लॅरिटी नसते त्यांना. आपण हुश् केलं किंवा टाळी जरी वाजवली तरी फडफडाट करत पळून जातात, पण जरा वेळानं पुन्हा त्याच जागेवर येऊन बसतात! आता जागा घेणारं कबूतर तेच असतं की नाही कोण जाणे. कारण शहरातली बहुतेक कबुतरं साधारण सारखीच दिसतात!
alt

सौंदर्याच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर खरं म्हणजे फार सुंदर दिसतात हे पक्षी. चित्रकलेच्या परीक्षेत कबूतर हा ‘विषय’ होऊ शकतो. जांभळट राखाडी रंगाच्या विविध छटा डोक्यापासून पंखांपर्यंत अलगद पसरलेल्या असतात. मानेवरती किंचित चमचमणारा एक शाही गर्द रंग असतो. लाल डोळे, चोच. नुसतं बसलेलं कबूतर फार शानदार दिसू शकतं. पण प्रॉब्लेम असा आहे की ते नुसतं स्वस्थ बसतच नाही कधी. बसल्याक्षणी घुमायला लागतं. काळ वेळ काहीही कळत नाही त्यांना. कुठेतरी बाथरूमच्या झडपेमागे, खिडकीच्या जाळीवर वगैरे घुसायचं आणि आपल्या सह पक्ष्यांशी आपल्या भाषेत संवाद साधणं सुरू करायचं. त्या गुटूरगुममध्ये काहीही गोडवा वाटत नाही. उलट डोकं उठतं त्या घूमत्कारानी!
इतक्या वैतागानी हे म्हणायचं कारण असं. की खिडकीतल्या कॅक्टसच्या कुंडीत कबूतरबाईंनी अंडी घातली आहेत. पुन्हा. किती मोठी असतात माहितीए कबूतरांची अंडी! आणि जन्मलेली पिल्लंही! जवळजवळ पूर्ण वाढ झालेल्या कबुतरांएवढीच दिसतात. कुंडीतल्या मातीत उघडय़ावर आहेत ती अंडी. धड पाणी घालता येत नाही आता. होणारी आई घाबरलेल्या चेहऱ्यांनी गप्प बसलेली असते अनेकदा त्यावर. सारखे काका, मावशी, आत्या, बाबा असे नातेवाईक भेटायला येतात. सगळे फडफड करून अंडय़ांची चौकशी करतात, बाकीच्या कुंडय़ांवर नाचतात, रोप तुडवतात. राग आला म्हणून हाकलताही येत नाही नीट. मुका जीव. वगैरे भूतदया अपराधी वाटायला लावते. पण इतकी कटकट वाटते ना. आपला मूड सुधारूच शकत नाही. चुकून घरात वगैरे शिरलं एखादं तर झालंच. बावरणे, भिरभिरणे, गोंधळणे एकूण काय फडफडाट गुणिले सावळागोंधळ!
पुण्यात आमच्या घराजवळ एक मोठी चाळ होती. तिथली काही तरुण मुलं, माणसं कबूतरं पाळायची. उडवायची. जाळीच्या कपाटांमध्ये मोजून ठेवायची. त्यांच्या उडवतानाच्या विशिष्ट शिट्टय़ा. हाकारे असायचे. असलं सगळं रस घेऊन करण्यासाठी खूप रिकामटेकडा वेळ पाहिजे बुवा आपल्याकडे. तसाच कबूतरखाना हा प्रकारच मला समजू शकत नाही. थवेच्या थवे जमतात तिथे कबूतरांचे. आणि पिशव्यांमध्ये भरून आणलेलं धान्य माणसं मुठीमुठींनी उधळत असतात त्यांच्यासाठी. दानधर्म केल्याबद्दल देव त्यांचं भलं करो. पण या कबूतर वंशाचे प्रजाजन इतर सामान्य माणसाची झोप उडवायला कारणीभूत ठरतात. यासाठी त्यांना काही पेनल्टी/ दंड नसतो. आपण मात्र शांतीचे दूत म्हणून उपद्रव माजवणाऱ्या या खगाचा आदर करत बसायचं. दिल्लीत आपल्या तिरंग्याच्या खाली-मैत्रीचे संदेश द्यायला एखादं राजेशाही पांढरं कबूतर उडवण्याचा प्रसंग दिसायला फार चांगला आणि उदात्त वगैरे वाटतो. पण तेच कबूतर येऊन बसू दे तुमच्या घराच्या खिडकीत. नाही तुमची शांती ढळली. तर मी नाव बदलायला तयार आहे.