सो कुल : का-रं? .. Print

alt

सोनाली कुलकर्णी , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आनंद कधी झाला पाहिजे आपल्याला?
खरेदी करण्यापूर्वी, खरेदी करताना की खरेदी झाल्यावर? एक नक्की की तीनही पायऱ्यांवर हसू नक्की येत राहतं.
तुम्ही खूप प्रगती करा. खूप पैसे मिळवा. तुमची भरभराट होऊ दे. सुख, समृद्धी हातात हात घालून तुमच्या आयुष्यात नांदू दे. तुम्ही स्टॉकमध्ये पैसे गुंतवा. तुमचे शेअर्स पन्नासपट किमतीला विकले जावोत. तुम्ही नवं घर घ्या. भरपूर कपडे घ्या. सोनं घ्या. चांदी घ्या. हिरे माणकंसुद्धा घ्या. पण. पण. पण. नवी गाडी घ्यायची की नाही याबद्दल पुन:पुन्हा विचार करा. बाकीच्या सर्व गोष्टी घेताना खूप पैसे आणि थोडय़ाफार सह्य़ा यात काम निपटलं जातं. पण नवी कार घेताना मात्र एक वेळ अशी येते, जेव्हा तुम्हाला ब्रह्मांड आठवतं आणि तुम्ही मनाशी चिडचिडत म्हणता. कशाला हवी होती नवी गाडी? जुनी काही म्हणावी तेवढी जुनाट झालेली नाही. चालवतोच आहोत की आपण अजून. थोडीफार कामं काय निघतातच कुठल्याही गोष्टीची.
आपण फार सरधोपट पद्धतीनं ‘गाडी घेणे’ या विषयाकडे वळतो. चालू गाडी एक दिवस अचानक, अनपेक्षितपणे बंद पडते. किंबहुना सुरूच होत नाही. त्याच दिवशी नेमकी आपली अति महत्त्वाची मीटिंग असते. पंधरावीस मिनिटं बॉनिट उघड, सारखी किल्ली मार, गाडी खाली वाकून बघ, धक्का मार. असे कल्पक प्रयत्न आपण करून बघतो. मग भरवशाच्या म्हशीला टोणगा असं मनात दात ओठ खाऊन म्हणत, चांगले इस्त्रीचे कपडे घालून, घामानी भिजत, विस्कटणारे केस, फायली, लॅपटॉप इ. सांभाळत आपण रिक्षा. रिक्षा. असं ओरडत रस्त्यानी धावत सुटतो. रिक्षा-टॅक्सीवाले आपलं मुक्कामाचं ठिकाण ऐकून नापसंतीचे चित्र-विचित्र चेहरे करतात. शेवटी एखादा चालक तयार होतो आणि रस्ताभर आपण मीटिंगचा सोडून ‘गाडी आत्ताच का बंद पडावी’ याचा विचार करत चिडत राहतो. मागच्याच महिन्यात सव्‍‌र्हिसिंगला दिली होती. तेव्हा तर ऑईल का काहीतरी बदललं होतं. मग आजच काय झालं बंद पडायला. ‘असला भुंगा लागतो डोक्याला.’ नेमके त्याच दिवशी बाकीचे सगळे जण वेळेवर आणि तेही छान दिसत आलेले असतात.
पाठोपाठ काही दिवसात पंक्चरचं काम  निघतं. पुढच्या रविवारी पेपरमध्ये नव्या गाडय़ांच्या पानपानभर जाहिराती आलेल्या असतात- त्या आपल्याला खुणावायला लागतात. मग ठरतंच आपलं. काही नाही. आता नवी गाडी घ्यायलाच पाहिजे! लगेच आपण पद्धतशीरपणे सव्‍‌र्हे सुरू करतो. सुरुवातीला आपण वेगळ्याच गाडीच्या चौकशीला जातो. तिथला दारवान आपल्यासाठी जरासुद्धा आदब दाखवत नाही. गाडीचा आकार आणि किंमत ऐकून आपल्याला दरदरून घाम फुटतो. बाहेर निघताना दार ढकलायची, पण शक्ती उरत नाही. तेव्हा मात्र दारवान दयाळूपणे बाहेरचा रस्ता दाखवायला मदत करतो. मग पुढच्या रविवारी बजेट आखण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तो बरेच आठवडे चालतो. सगळ्यात स्वस्त गाडी घ्यायचं अजिबात आपल्या मनात येत नाही. कायम बजेटमध्ये न बसणारी गाडीच आपल्याला आवडते.
टीप लागल्यासारखे शोरूम आणि फायनान्सवाले आपल्या मागे लागतात. कधी येता शोरूममध्ये? कॉफी घेता का थंड काही? कधी पाठवू गाडी टेस्ट ड्राइव्हला? असा घोषा लावतात. आपण बिचकलो. तर काय काळजी करता? सुरुवातीचे तीन लाख आहेत ना. मग झालं. असं पोकळ आश्वासन छातीठोकपणे ऐकवत राहतात. आपलीही उगीच समजूत पटल्यासारखी होते. आपण मग कारण नसताना लेगस्पेस, ग्राऊण्ड क्लीअरन्स, हॅचबॅक वगैरे शब्द मित्रमैत्रिणींसमोर फेकायला लागतो. खरं म्हणजे सगळ्याच गाडय़ा चांगल्या असतात. प्रत्येक गाडीचं माईलेज तळ्यात मळ्यात असतं. प्रश्न असतो. आपल्या खिशाचा.
फायनान्सवाले हात धुवून मागे लागतात. आपण काय काय लागेल विचारतो तेव्हा फक्त पॅनकार्ड, पासपोर्ट कॉपी असं सांगतात हसून. पण एकदा कारचं पक्क झालं, लोनची रक्कम ठरली की आपल्या तोंडाला फेस येईपर्यंत कुठली कुठली कागदपत्रं मागत राहतात. थोडक्यात पत्रिका-कुंडली सोडून जवळजवळ सगळ्या गोष्टी मागतात. आणि हे लोनवाले एकदा यादी देऊन मोकळे होत नाहीत. मारुतीच्या शेपटीसारखं वाढवतच राहतात लटांबर. याची झेरॉक्स द्या, आयटी रीटर्नस् द्या, त्याचं पान नंबर अमुक पण द्या, पासपोर्टच्या फोटोकॉपीवर सही करा, सेल्फ अटेस्टेशन झालं का? आपण शेवटी शेवटी गोंधळून जाऊन दिसेल तिथे सह्य़ा करत सुटतो. मग येतो पुढचा टप्पा...