टेस्टी टेस्ट : स्मूदीज अॅण्ड मोअर Print

शेफ देवव्रत जातेगावकर , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२

घरी बऱ्याच वेळा फळे आणून पडलेली असतात. ती खायला घरची बच्चे मंडळी तयार नसतात. त्यांना काहीतरी इंटरेस्टिंग नेहमीच हवं असतं. या आठवडय़ात फळांचा वापर करून बनवू या स्मूदीज आणि डेझर्ट. थोडा चेंज कुठल्याही गोष्टीत चांगलाच वाटतो. चला तर मग करायची का सुरुवात?
लिची रोस्टेड बदाम स्मूदी (दोन ग्लाससाठी)
साहित्य : लिची- ८, दही- ३ चमचे, फ्रेश क्रीम- २ चमचे, दूध- १ ग्लास, व्हॅनिला आइस्क्रीम- ३ चमचे, साखर- ३/४ चमचे,  रोस्टेड बदाम- ५/६.
कृती : मिक्सरच्या भांडय़ात लिची टाका. त्यामध्ये तीन चमचे दही, फ्रेश क्रीम, दूध, व्हॅनिला आइस्क्रीम व साखर टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आता त्यामध्ये रोस्टेड बदामचे स्लाइस करून टाका. असल्यास २/३ थेंब लिची इसेंस टाका. नंतर हे मिश्रण ग्लासमध्ये ओतून सव्‍‌र्ह करा.

पपया बनाना स्मूदी (दोन ग्लाससाठी)
alt
साहित्य : पपया तुकडे- २०० ग्रॅम (१ वाटी), बनाना- २, दही- ४ चमचे, फ्रेश क्रीम- २ चमचे, दूध- १ ग्लास (तापवून थंड केलेले), व्हॅनिला आइस्क्रीम- ३ चमचे, साखर- ३/४ चमचे, आइस क्युब्स- ८/१०.
कृती : मिक्सरमध्ये पपया व बनाना घाला. त्यामध्ये दोन चमचे दही टाका. आता त्यामध्ये दोन चमचे फ्रेश क्रीम टाका. या मिश्रणामध्ये एक चमचा व्हॅनिला आइस्क्रीम, साखर आणि दूध टाकून फेटून घ्या. आता बारीक चिरलेले पपईचे व केळ्याचे तुकडे घाला व ग्लासमध्ये सव्‍‌र्ह करा.

चॉकलेट बनाना डिलाइट :
alt
साहित्य : कस्टर्ड पावडर- ४० ग्रॅम (३ टी स्पून), दूध- ५०० मि.लि., साखर- १०० ग्रॅम, कुस्करून घेतलेली केळी- ४, मध- ३ चमचे, व्हॅनिला इसेन्स- ३/४ ड्रॉप, फेटून घेतलेले क्रीम- २५० ग्रॅम, पिठी साखर- १०० ग्रॅम, डार्क चॉकलेट (वितळवून घेतलेले).
इतर साहित्य : केळ्याचे काप- २ केळी,  बनाना इसेन्स.
कृती : एका भांडय़ामध्ये साखर, दूध आणि कस्टर्ड पावडर एकत्र करून घ्या व तापवून त्याचं कस्टर्ड तयार करून घ्या. हे कस्टर्ड थंड झाल्यावर मिक्सरच्या भांडय़ात टाका. आता त्यामध्ये कुस्करून घेतलेली केळी, बनाना इसेंस, मध, पिठी साखर आणि वितळवून घेतलेले चॉकलेट व फेटून घेतलेले क्रीम घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. आता काचेच्या छोटय़ा बाऊलमध्ये फेटून घेतलेले क्रीम एक एक चमचा टाका. केळ्याचे छोटे तुकडे क्रीमवर ठेवा. आता चॉकलेट व केळ्याचे मिश्रण वर ओता. आता हे मूस फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा. सेट झाल्यावर फेटून घेतलेले क्रीम व पुदिना पानाने गाíनश करा.