कट्टा Print

डी. के. बोस , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कट्टय़ावर तसा अंधारच होता, टपरीवरचा बल्ब बंद झाला होता, कट्टय़ावर तसं कोणीच नव्हतं. सुशांत या कट्टेकऱ्यांना शोधत कट्टय़ावर पोहोचला खरा, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याने मग हुकमी एक्का असलेल्या चोच्याला फोन केला, तर त्याचा फोन नॉट रीचेबल होता. त्याने मग अभ्याला कॉल केला, ‘अरे एक काम कर, कॉलेजच्या गेटवर ये आणि मिस कॉल दे, तुला पास देतो मी’ असं म्हणत अभ्याने कॉल ठेवला. सुशांतने गेटवर गेल्यावर अभ्याला मिस कॉल दिला आणि बाजूला उभा राहिला. काही वेळात अभ्या आला आणि त्याने सुशांतला पास देऊन आतमध्ये घेतला. हॉलमध्ये चालत जाताना ‘अरे चोच्या कुठे आहे साला, कॉल केला तर नॉट रीचेबल’ असं सुशांत बोलला. त्यावर अभ्या म्हणाला, अरे त्याच्याकडे गरब्याच्या डीजेचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय कॉलेजने, त्यामध्येच तो बिझी आहे. ‘म्हणजे चोच्या डीजे वाजवणार की काय?’ या सुशांतच्या प्रश्नावर अभ्या हसला. अरे तो काय वाजवणार, त्याने एका मित्राला आणलंय वाजवायला. त्याला सगळी अरेंजमेंट करून देतोय तो. असं अभ्या बोलल्यावर हलक्याच आवाजात त्याने विचारलं, प्राजक्ता आली असेल ना, या प्रश्नावर अभ्या लगेचच बोलला, अरे च्यायला टेन्शन कशाला घेतोस, सगळ्यांना आम्ही कम्पल्सरी केलाय गरबा, ती आली असेलंच, पण तिला शोधायला मात्र जाम कटकट होणार यार, पण डोन्ट वरी सुश्या आणि स्वप्ना आहेत ना, त्या सगळं मॅनेज करतील.
हॉल मस्त भरलेला होता, पुढे मैदानात मस्त लाइट्स लावलेल्या होत्या. पण गरबा अजून सुरू झालेला नव्हता, कारण चोच्याच्या मित्राला अजून सेटिंग करता आली नव्हती. त्यामुळे मुलं आपल्या ग्रुप्समध्ये उभी राहून टाइमपास करत होती. थोडं पुढे चालत गेल्यावर त्यांना त्यांचा ग्रुप भेटला, चोच्या नव्हताच, पण बाकीचे सर्व होते. प्राजक्ताला शोधायचं काम तुझं, असं अभ्या सुश्याला म्हणतो न म्हणतोच तर सुश्याने उजव्या बाजूला तिसऱ्या ग्रुपमध्ये पिवळ्या चनिया चोलीमध्ये बघं, असं म्हटलं आणि सर्वानीच तिचं कौतुक केलं. याबाबतीत सुश्या सॉलीड फास्ट होती.
सुशांत हा खरं तर चोच्याच्या कॉलनीतला खास मित्र, त्यामुळे तो कट्टय़ावर यायचा आणि त्यामुळेच या सगळ्यांच्या ओळखीचा झालेला होता. त्याला यांच्या कॉलेजमधली प्राजक्ता राणे नावाची मुलगी आवडलेली आणि गरब्याच्या निमित्ताने त्याचं सेटिंग करण्याचं सर्वानी ठरवलेलं. थोडय़ाच वेळात अनाऊन्समेंट झाली, गरबा सुरू होतोय म्हणून. त्यामुळे सगळेच तयार सरसावले. ‘ए नाम रे, सबसे बडा तेरा नाम’ हे पहिलं गाणं लागलं आणि काही जणांनी आपसूकच ताल धरला. चोच्या कुठेच दिसत नव्हता, काम तर झालं होतं, पण चोच्या गायब होता. काही गाणी झाली, पण कट्टेकरी नाचायला उतरले नव्हते, कारण प्राजक्ता दिशेनासी झाली होती. तिला या साऱ्यांच्या नजरा शोधायला लागल्या. काही वेळांनी ‘चलाओ ना नैनों से बाण रे’ हे गाणं लागलं आणि स्टेजवर चोच्या भगवानदादांच्या स्टाईलमध्ये नाचायला लागला, सर्वाचंच लक्ष त्याने वेधून घेतलं होतं. क्रीम कलरचा कुर्ता आणि जीन्स असं मस्त कॉम्बिनेशन होतं. नाचत नाचत तो खाली उतरला आणि एका मुलींच्या ग्रुपमध्ये फेर धरून नाचायला लागला. कट्टेकरांना काही कळेनाच, नंतर काळजीपूर्वक पाहिलं तर तो प्राजक्ताचा ग्रुप होता, चोच्याने झकास अरेंजमेंट केल्यामुळे तो कॉलेजमध्ये सगळ्यांचाच लाडका झालेला होता, त्यामुळे प्राजक्ताच्या ग्रुपमध्ये तो सहजपणे घुसला आणि त्यांनीही त्याला आपल्यात सामील करून घेतला. थोडय़ाच वेळात त्याने ‘माझ्या ग्रुपला इथेच नाचायला बोलवू का’ असं प्राजक्ताला विचारलं, तिनेही मान डोलावली. त्याने मग कट्टेकऱ्यांना इशारा करत नाचायला बोलावलं आणि काही जणांची टय़ूब पेटली. चोच्या सुशांतची सेटिंग करतोय, हे कळण्याइतपत ते काही खुळे नव्हते. ग्रुपचा गोल मोठा झाला. थोडय़ाच वेळात प्राजक्ता आणि सुशांतची नजरानजर झाली, हा कसा काय आपल्या कॉलेजच्या गरब्याला आला, असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते, तरी ती काहीच बोलली नाही. तो तिच्या मागे होता हे तिला माहितीच होतं. मुली या बाबतीत तशा हुशारच असतात, आता तिचा शक यकीनमध्ये बदलला होता. थोडय़ा वेळानं रेस्ट घ्यायला सगळेच थांबले, तेव्हा चोच्याचा प्लॅन तिलाही कळून चुकला. ती बेधडकच होती, चोच्याजवळ जाऊन त्याला ती काही तरी बोलली, गाण्याच्या आवाजामुळे कोणाला काहीच कळलं नाही, तिचं बोलणं झाल्यावर चोच्या गालातल्या गालात हसला, कोणाला काहीचं कळलं नाही. प्राजक्ताच्या चेहऱ्यावरचे भाव काही वेगळे नव्हते, ती टेन्शनमध्ये किंवा रागावलेली दिसत नव्हती. चोच्याला तिच्या मनातलं कळलं असावं. तो हळूच सुशांतजवळ आला आणि ‘देवी पावली तुला’ असं म्हणाला आणि आपल्याच धुंदीत पुन्हा गरब्यात शिरला.