‘अस्तित्व.. कोंडीचं’! Print

प्रियांका पावसकर , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नाटय़स्पर्धाच्या जगतात खास करून एकांकिकांच्या जगात ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पध्रेचं आगळं महत्त्व आहे. मराठी नाटय़वर्तुळात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या स्पध्रेचं यंदाचं हे पुनरुज्जीवित स्वरूपातलं नववं आणि एकंदर सव्विसावं वर्ष होतं.
‘आम्हास आम्ही पुन्हा पाहावे..’ यंदाच्या या हटके थीमवर दरवर्षीप्रमाणे ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या अभिनव एकांकिका स्पध्रेची महाअंतिम फेरी चुरशीत रंगली. एकाच विषयावर संपूर्णपणे नवे लेखन ही अट असलेल्या ‘कल्पना एक..’च्या विषयावर विविध स्पर्धकांनी सादर केलेल्या कसदार नाटय़विष्कारात ठाण्याच्या ‘जोशी-बेडेकर’ महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘कोंडी’ एकांकिकेने बाजी मारत अस्तित्वच्या रंगभूमीवर प्राथमिकपासून महाअंतिम फेरीपर्यंत आपलं अस्तित्व अबाधित ठेवलं.
नाटय़स्पर्धाच्या जगतात खास करून एकांकिकांच्या जगात ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पध्रेचं आगळं महत्त्व आहे. मराठी नाटय़वर्तुळात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या स्पध्रेचं यंदाचं हे पुनरुज्जीवित स्वरूपातलं नववं आणि एकंदर सव्विसावं वर्ष होतं. दरवर्षी एक वेगळी थीम देऊन लेखक-दिग्दर्शकांच्या सृजनशीलतेला वाव देणाऱ्या ‘कल्पना एक..’च्या या एकांकिका स्पध्रेसाठी यंदा ‘आम्हास आम्ही पुन्हा पाहावे..’ प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर कधी ना कधीतरी निर्माण होणारा ‘स्व’परीक्षणाचा क्षण या आशयात गुंफलेला हा विषय समकालीन नाटककार ‘अभिराम भडकमकर’ यांनी सुचवला होता.
मुंबई, उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा या तीन विभागांत घेण्यात आलेल्या या स्पध्रेतल्या निवड झालेल्या सहा एकांकिकांची महाअंतिम फेरी दादर येथील ‘शिवाजी मंदिर’ नाटय़गृहात पार पडली. अंतिम फेरीसाठी विषयसूचक अभिराम भडकमकर यांच्यासोबत ज्येष्ठ दिग्दíशका प्रतिमा कुलकर्णी आणि अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी स्पध्रेचे परीक्षण केले. अभिराम यांनी दिलेल्या विषयावर प्राथमिक फेरीत एकूण २६ संघांनी आपले विविध रंगाविष्कार सादर केले. त्यापकी ६ एकांकिका अंतिम फेरीत सादर झाल्या. त्यात ‘वाटे आम्हा पुन्हा जगावे’ (वरदंबिका कलासंघ-फोंडा), ‘मी शोधलेला आरसा’ (संताजी महाविद्यालय नागपूर), ‘रात्र झाली गोकुळी’ (तक्षदा आर्ट्स, डोंबिवली), ‘आज छुट्टी है’ (यशोदा प्रतिष्ठान  मुंबई), ‘कोंडी’ (जोशी-बेडेकर महाविद्यालय ठाणे), ‘आपुलाची वाद आपणासी’ (चौकट वसई) या एकांकिकांचा समावेश होता. विशेष म्हणजे अंतिम फेरीत दाखल झालेल्या ६ पकी तीन एकांकिका ठाणे जिल्ह्यातल्या होत्या. दरम्यान, एकांकिका क्षेत्रात स्वत:चा वेगळा दबदबा निर्माण करणाऱ्या ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाची आदिवासी भागात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर आधारलेली ‘कोंडी’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली, तर ‘तक्षदा’ आर्ट्स, डोंबिवलीची गावातील सत्तासंघर्षांत स्त्रियांचा दिला जाणारा बळी यावर आधारित ‘रात्र झाली गोकुळी’ उपविजेती ठरली.
अंतिम फेरीतल्या एकांकिका पाहताना एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली ती म्हणजे काही स्पर्धकांनी सुचविलेल्या विषयाचा अगदी शब्दश: अर्थ लावला होता, तर काहींनी त्या अनुषंगाने मानवी नाती, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, गांधी तत्त्वांवर आधारित मूल्ये, पशाच्या मोहापायी दुरावलेली नाती, स्त्री संरक्षणाबाबतची जागरूकता.. वगरे विविध अंगांनी या विषयाशी जवळीक साधली होती. अंतिम फेरीतल्या सर्वच एकांकिका दर्जेदार नव्हत्या, तरीही त्या वेगवेगळ्या प्रकारे विषयाशी भिडल्या होत्या हे निश्चित. त्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाची ‘कोंडी’ ही एकांकिका! महाराष्ट्रातील दुर्गम खेडय़ांमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर आधारित ‘कोंडी’च्या चोख सादरीकरणाला संपूर्ण प्रेक्षागृह आ वासून बघतच राहिला. हृषीकेश कोळी लिखित आणि अमोल भोर दिग्दíशत ‘कोंडी’ या एकांकिकेत नंदुरबारच्या एका आदिवासी पाडय़ात एका पोलीस स्टेशनमध्ये एक गर्भार आदिवासी स्त्री संरक्षणासाठी धाव घेते. आपल्या पोटी वाढत असलेली मुलगी जन्माला घालण्याची तिची इच्छा असते. याआधी तिच्या मुली गर्भातच मारल्या गेलेल्या असतात. मात्र तिला या वेळी पूर्ण गर्भारपण अनुभवायचे असते. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ती एका सामाजसेविकेच्या संपर्कातही असते. अखेर पोलीस स्टेशनमध्येच प्रसूत झालेली स्त्री, ती समाजसेविका आणि नुकतीच जन्मलेली ती मुलगी अशा तिघींचीही आयुष्ये समान पातळीवर येतात आणि स्त्रीत्वाचा पुन्हा एकदा शोध घेण्यासाठी स्त्री जन्माची कहाणी पुन्हा एकदा तपासून पाहण्याचा त्यांचा प्रवास अनपेक्षित वळणावर येतो, अशी कोंडीची कथा! तृप्ती गायकवाडने या एकांकिकेत साकारलेली आदिवासी स्त्रीची भूमिका अंगावर शहारे आणते. एवढेच नाही तर भूमिकेला न्याय मिळवून देणाऱ्या तिच्यातल्या जिद्दीचं कौतुकही वाटतं. श्रेयस राजे आणि गौरव निमकर यांनी दाखवलेली विलक्षण तडफ यांना सुप्रीम पाठारे, नम्रता सावंत यांनी दिलेली समर्थ साथ तसेच सुप्रिया शिवणकरचा निरागस अभिनय हे या एकांकिकेचं आणखी एक वैशिष्टय़ होतं. हृषीकेश  कोळी लिखित आणि अमोल भोर दिग्दíशत या एकांकिकेचा सहजस्फूर्ततेचा गाभा, पात्रांचा दमदार अभिनय ‘कोंडी’ला ‘सर्वोत्कृष्ट एकांकिकेच्या’ पुरस्काराप्रत घेऊन गेला. सोबतच वैयक्तिक निकालात कोंडीतल्या उत्कृष्ट अभिनयासाठी तृप्ती गायकवाडला प्रथम, श्रेयस राजेला द्वितीय पारितोषिक, तर सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शनासाठी हृषीकेश कोळी आणि अमोल भोर यांना गौरवण्यात आले. एकांकिकेचा दर्जा दर्शवणारी चारही महत्त्वाची बक्षिसे जोशी-बेडेकरने कोंडीच्या रूपात आपल्या खात्यात जमा केली.
व्यावसायिक रंगभूमीच्या चौकटीबाहेर पडून नव्या नाटय़ शक्यता आजमवण्याची संधी प्रस्थापित कलाकार, लेखक, दिग्दर्शकांना देणाऱ्या या प्रतिष्ठेच्या खुल्या गटाच्या स्पध्रेला २००४ सालापासून आजतागायत नारायण सुर्वे, विजया मेहता, श्रीराम लागू, रत्नाकर मतकरी, गिरीश कर्नाड वगरेंसारखे दिग्गज नाटय़कर्मी विषयसूचक म्हणून लाभले. अस्तित्वच्या परंपरेप्रमाणे पुढच्या वर्षीच्या स्पध्रेसाठी ‘हे किरकोळ, ते महत्त्वाचे’ हा विषय ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी सुचवला असून पुढच्या वर्षीच्या ‘कल्पना एक..’च्या एकांकिकांच्या अंतिम फेरीची तारीख १९ ऑक्टोबर २०१३ जाहीर करण्यात आली आहे.
खरोखरच, एक काळ असा होता जेव्हा रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात एखाद्याला शिरकाव करायचा असेल तर ‘राज्यनाटय़’ स्पर्धा हे एकमेव मोठे व्यासपीठ गावोगावच्या रंगकर्मीना उपलब्ध होतं. त्याच काळात ‘कल्पना एक आविष्कार अनेक’च्या एकांकिका स्पध्रेने आणखीन एक व्यासपीठ नाटय़क्षेत्रात आपले हुन्नर सिद्ध करणाऱ्यांना मिळवून दिले. या स्पध्रेचे अनोखे वैशिष्टय़ म्हणजे स्पध्रेकरिता दिलेल्या विवक्षित विषयाच्या अनेकानेक नाटय़शक्यता पडताळून पाहण्याची संधी या स्पर्धत नाटय़कर्मीना मिळते आणि म्हणूनच सृजनशील लेखकांबरोबरच समस्त नाटय़कर्मीसाठी हे एक मोठे आव्हान आहे. हे आव्हान स्वीकारून एकाच विषयाला अनेक रंगकर्मी आपापल्या परीनं, वेगवेगळ्या पद्धतीनं कल्पनेच्या आविष्कारात रंगवून येथील रंगमंचावर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.