न्यू स्टुडंट्स इन बॉलीवूड Print

प्रभा कुडके , शुक्रवार , १९ ऑक्टोबर २०१२

आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा सध्या या तिघांचे नाव कॅम्पसमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. खूप दिवसांनंतर तीन नवे चेहरे आपल्यासमोर येत आहेत  करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटाच्या माध्यमातून. त्यानिमित्ताने या तिघांशी मारलेल्या गप्पा..
बॉर्न टू बी अ‍ॅक्टर.. - आलिया भट
alt
महेश भट आणि सोनी राजदान यांची मुलगी आलिया. तिच्या सर्वात मोठय़ा आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटाविषयी भलतीच खूश आहे. बडबडय़ा आलियाला प्रश्नांची उत्तरं देतानाही आता बस्स कर असं सांगावं लागतं. इतकी ती बोलताना वेळेचं आणि काळाचं भान विसरून बडबड करते. आलियासाठी हा चित्रपट स्टेपिंग स्टोन असल्याचं ती म्हणते. वडिलांचं प्रोडक्शन हाऊस असताना दुसऱ्या प्रोडक्शन हाऊसबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव शेअर करताना ती म्हणते, नवीन लोकांबरोबर नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मला आमच्या प्रोडक्शन हाऊसमधील अनेक लोक ओळखतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं माझ्यासाठी सर्वात सोप्पी गोष्ट होती. पण मी ते न करता करण जोहरच्या या चित्रपटासाठी ऑडिशनला गेले आणि एका गाण्यावर डान्स करून दाखवला आणि तब्बल चारशे मुलींमधून माझी निवड झाली. चित्रपटाचं बाळकडू मला लहानपणापासूनच मिळालं आणि मलाही याच मार्गावर जायचं होतं असं ती अगदी आत्मविश्वासाने सांगते. अधिक बोलताना ती म्हणाली, मी जन्मालाच आलेय कारण मला स्टार व्हायचं होतं..

माय डॉग इज माय बेस्ट फ्रेंड..- सिद्धार्थ मल्होत्रा
alt
आय एम पंजाबी म्हणत हा मुलगा दिल्लीहून मुंबईत दाखल झाला तो डायरेक्ट धर्मा प्रोडक्शनमध्ये. स्टुडंट ऑफ द इअर हा चित्रपट सिद्धार्थसाठी एक मोठा ब्रेक असल्याचं तो म्हणतो. अधिक बोलताना तो म्हणाला, माझ्या घरचे या क्षेत्रात कुणीही नसताना मला हा चित्रपट मिळणं ही माझ्यासाठी खूपच मोठी बाब आहे. ऑडिशनच्या लाइनमध्ये उभं असताना हा चित्रपट मिळेल असं वाटलंच नव्हतं. मुंबईत अनेकजण स्वत:ला सिद्ध करण्यासाठी येतात. तसाच मी आलो आणि हा ब्रेक मिळाला. माझ्यासाठी हा ब्रेक म्हणजे सुवर्णसंधीच आहे. अनेक तरुणी आता मला ओळखू लागल्या आहेत. मला तशा कॉम्प्लिमेंट्स अगदी बिनदिक्कत समोर मिळताहेत हे पाहून बरं वाटतं. सध्या मुंबईत मी माझ्या लॅब्रेडोर या डॉगबरोबर राहतोय. त्यामुळे सध्याचा माझा बेस्ट फ्रेंड तोच आहे. त्याच्याबरोबरच मी माझ्या मनातील अनेक गोष्टी शेअर करतोय.

आय एम रॉक.. - वरुण धवन..
alt
डब्लूडब्लूएफच्या वेडानं झपाटलेला हा वरुण. याला डब्लूडब्लूएफ या खेळातील रॉक व्हायचं होतं. रेस्टलर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून बॉडी बनवण्यासाठी हा दिवस-रात्र एक करत होता. पण याच्या समोर काहीतरी वेगळंच होतं. डेव्हिड धवन यांचा हा छोटा मुलगा वरुण हा इंडस्ट्रीत सर्वाच्याच परिचयाचा. करण जोहरशी एकदा पार्टीत भेट झाली आणि डायरेक्ट एन्ट्री मिळवली स्टुडंट ऑफ द इअरमध्ये. वरुणला तुला दिग्दर्शक व्हायला आवडेल की अ‍ॅक्टर असा प्रश्न विचारला की तो लग्गेच उत्तरतो. मला रेस्टलर व्हायचं होतं. पण घरच्यांनी माझं हे स्वप्न अगदी तोडून मोडून टाकलं. रॉक हा माझा आदर्श असल्याने मी त्याच्यासारखी बॉडी आणि त्याच्यासारखा लूक असावा या प्रयत्नात असायचो. पण घडलं काही वेगळंच. असं सांगताना वरुण जुन्या आठवणींना उजाळा देतो. अधिक बोलताना तो म्हणाला, आजही मला झोपेतून उठवलं आणि विचारलं तुला काय करायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तरं मी रॉकच्या स्टाइलमध्येच देतो.. आय एम रॉक..